पश्चिम रेल्वेचा अजब कारभार समोर आला आहे. एकीकडे महिलांसाठी जागोजागी शौचालयं व्हावीत यासाठी काही महिला संघटना आवाज उठवत असताना बोरिवली रेल्वे स्थानकावर महिलांसाठी दरवाजा नसलेली शौचालयं उभारण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या संयुक्ता सिंह यांनी हा प्रकार समोर आणला आहे.

संयुक्ता सिंग जेव्हा बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर असणाऱ्या महिला शौचालयात गेल्या तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. शौचालयात प्रचंड दुर्गंधी तर होतीच, पण भारतीय पद्धतीच्या या शौचालयात ना दरवाजे होते, ना पाणी होतं. ‘हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. मी तेथील रेल्वे स्टाफच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण त्यांनी आपण काहीच करु शकत नसल्याचं सांगितलं’, अशी माहिती संयुक्ता यांनी दिली.

‘माझी स्वयंसेवी संस्था We Can, We Will च्या काही सहकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली असता त्यांनीही हात वर करत यामध्ये आपण काहीच मदत करु शकत नसल्याचं सांगितलं. यानंतर मी फोटो ट्विट करत ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली’, असं संयुक्ता यांनी सांगितलं.

ट्विटमध्ये त्यांनी संताप व्यक्त करत या शौचालयांमध्ये माणसांनी जावं अशी अपेक्षा तुम्ही करता असा सवाल विचारला. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने, या गोष्टीचा तपास करु आणि जर कंत्राटदाराने अपूर्ण काम केलं असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करु अशी माहिती दिली.

संयुक्ता यांच्या ट्विटला रेल्वेने उत्तर देत माफी मागितली आणि संबंधित अधिकाऱ्याला स्वच्छतेची तसंच अपूर्ण कामाची दखल घेण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत ट्विटरकरांचा संताप झाला होता. पुरुषांसाठी उभारण्यात येणारं शौचालय ऐनवेळी महिलांना दिलं का ? असे सवाल ट्विटरवर विचारण्यात आले.