बालमजूर, पदपथावरील आणि वस्त्यांमधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या ‘डोअरस्टेप स्कूल’साठी त्यांचे शिक्षक हाच मोठा आधारस्तंभ आहे. मात्र, टाळेबंदीमुळे आर्थिक मदत थांबली आणि शिक्षकांचे वेतनही थांबले. वस्त्यांमध्ये दारोदार फिरून शिक्षणाची गंगा वाहती ठेवणाऱ्या या शिक्षकांना आधार देण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे.

संस्थेचे मुंबईत १५० शाळा शिक्षक आणि वस्ती शिक्षक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १३५ वस्ती शिक्षक आणि ९२ शाळा शिक्षक आहेत. याशिवाय परीक्षक, शिक्षक प्रशिक्षक, समुपदेशक इत्यादी कर्मचारीही संस्थेबरोबर काम करतात. त्यांना वेतन कोठून द्यायचे असा प्रश्न संस्थेपुढे आहे.

मुंबईत ३० ते ४० हजार आणि पुणे परिसरात ७० हजार विद्यार्थी संस्थेशी जोडलेले आहेत. यातील ५५ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी डिजिटल उपकरणे नाहीत. संस्था के वळ ५० टॅबची व्यवस्था करू शकली. त्यामुळे त्यांना उपकरणे आणि इंटरनेटसाठी संस्थेला निधीची गरज आहे.

बालमजुरी, बालविवाह, गरिबी हे प्रश्न शिक्षणाने सुटतील, असा ठाम विश्वास असल्याने ‘विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचत नसतील तर शाळा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे’, या विचाराने गेली ३० वर्षे ‘डोअरस्टेप स्कू ल’ काम करत आहे. आदिवासी पाडय़ांवरील, मत्स्यव्यवसायातील, मध गोळा करणारी लहान मुले, रस्त्यावर लिंबू-मिरची, फुगे विकणारे अल्पवयीन फे रीवाले यांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने वस्त्यांमध्ये स्थानिक शिक्षकांची नेमणूक केली आहे. विद्यार्थ्यांसारखेच राहणीमान असणारे, त्यांचीच भाषा बोलणारे शिक्षक विद्यार्थ्यांना आपलेसे वाटतात. शिवाय शाळेत दूरचा प्रवास करून जावे लागत नसल्याने या उपक्रमाला उत्साही प्रतिसाद मिळत आहे.

शाळेबाहेर अनौपचारिकरीत्या शिक्षण घेऊन अपेक्षित कौशल्ये मिळवल्यानंतर ही मुले पालिका शाळांमध्ये दाखल होतात. शाळेत विद्यार्थ्यांच्या गर्दीशी, तेथील क्रमिक पुस्तकांशी आणि शिक्षणेतर कामांमध्ये गुंतलेल्या शिक्षकांशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना जड जाते. म्हणूनच संस्थेचे शिक्षणशास्त्रातील पदवी आणि पदविकाधारक शिक्षक पालिका शाळांमध्ये जाऊन अतिरिक्त मार्गदर्शन करतात. शाळा बंद असल्याने हे शिक्षक वस्त्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत. वऱ्हांडय़ात, गल्लीत, जागा मिळेल तेथे शिक्षण सुरू आहे. नुसते शिक्षण नाही तर करोनाविषयक जनजागृती, धान्यवाटप इत्यादी कामेही शिक्षक करीत आहेत. परंतु या उपक्रमापुढे आता आर्थिक संकट उभे राहिले आहे.