हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे मुंबईतील दुसरे डॉप्लर रडार बसवण्याच्याा जागेचा अडसरही दूर झाला असला तरी त्याचा उपयोग येत्या पावसाळ्यासाठी करता येऊ शकणार नाही. हे रडार बसवून ते कार्यान्वित होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती भारतीय वेधशाळा विभागातर्फे सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

मुंबईतील या दुसऱ्या डॉप्लर रडारसाठी जोगेश्वरी, वेरावरी येथील जलसाठय़ाजवळील जागेची निवड करण्यात आली आहे. तसेच या जागेचा ताबा या आठवडय़ाच्या अखेरीपर्यंत भारतीय वेधशाळा विभागाकडे सोपवला जाईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली. शिवाय जागेसाठी कुठलेही भाडे पालिकेकडून आकारण्यात येणार नाही. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात आल्याची माहितीही साखरे यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर जागेचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच हे डॉप्लर रडार बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. परंतु ते बसवून कार्यान्वित करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागेल, असे भारतीय वेधशाळेच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

डॉप्लरसाठी जागा निश्चित करणाऱ्या प्रस्तावावर काहीच निर्णय न झाल्याने गेली अनेक वर्षे हा प्रश्न धूळ खात पडून होता. त्यावरून खुद्द मुंबई महापालिका आयुक्तांची न्यायालयाकडून कानउघाडणी करण्यात आली होती. त्यानंतर पालिका प्रशासन हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले होते. पालिकेच्या सुधार समितीने हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला होता.

गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा थांबली होती. त्यामुळे अ‍ॅड्. अटल दुबे यांनी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. तसेच २५ जुलै २००५च्या मुंबईतील महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.