मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत या आठवडय़ात काढण्यात येणार असून उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव, टाळेबंदी यांमुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले. त्यातच अनेक खासगी शाळांकडून शुल्कासाठी तगादा लावण्यात येत असल्यामुळे शाळा आणि पालकांमध्ये वाद रंगला. त्यामुळे २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. यंदा ३० मार्चपर्यंत पालकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या मिळून राज्यात ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी यंदा तब्बल २ लाख २३ हजार ६१ विद्यार्थ्यांंचे प्रवेश अर्ज आले आहेत. येत्या आठवडय़ात प्रवेशासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

एकच प्रवेश फेरी

यंदा एकच प्रवेश फेरी घेण्यात येणार असून त्यानुसार प्रवेशासाठी एकदाच सोडत काढण्यात येणार आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून रिक्त जागेवर त्यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबईत १३ हजार :मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांत २५ टक्क्यांच्या ५ हजार २२७ जागा असून यासाठी १३ हजार ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत. पुणे जिल्ह्य़ातील १४ हजार ७७३ जागांसाठी आतापर्यंत ५५ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर नागपूर जिल्ह्य़ातील ५७२९ जागांसाठी २४ हजार १६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.