मुंबई-पुणे मार्गासाठी चाचपणी सुरू; ‘शिवनेरी’ला पर्याय
एसटी म्हटले की, लाल डबा आणि त्यावर गच्च बांधलेले सामान असे सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र येणाऱ्या काळात याच प्रतिमेला छेद देत, एसटीची वातानुकूलित ‘डबल डेकर’ गाडी चालवण्याचा पर्याय चाचपून पाहिला जात आहे. मुंबई-पुणे मार्गावर ही गाडी चालवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वाहतूक खात्याकडून व्यवहार्यता तपासली जात असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या एसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बसगाडय़ा चालवल्या जातात. या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वातानुकूलित डबल डेकर गाडी चालवल्यास दोन चालकांऐवजी एकच चालक पुरेसा ठरेल. त्यामुळे त्या चालकाला इतर बस गाडीवर पाठवता येईल. याशिवाय गर्दीच्या वेळेत अधिक प्रवासी वाहतूक करणे सोपे होईल. यामुळे डबल डेकर बस गाडीचा विचार केला जात असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ११० शिवनेरी बसगाडय़ा आहेत. यातील ६१ मालकीच्या तर ४९ भाडेतत्त्वावरील आहेत. या गाडय़ा मुंबई, ठाणे, पुणे-नाशिक, दादर-स्वारगेट, दादर-पुणे, परळ-औरंगाबाद, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट मार्गावर चालवल्या जातात. या मार्गावर या गाडय़ांना प्रवाशांकडूनही पसंती दिली जाते. मात्र डबल डेकर गाडी चालवल्यास एसटीला अधिक नफा होण्याची शक्यता असल्याने परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबई-पुणे मार्गावर वातानुकूलित डबल डेकर बससेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात आहे.
पहिली वातानुकूलित डबल डेकर बस गाडी मुंबई-पुणे मार्गावर चालवण्यापूर्वी महामंडळातील अधिकाऱ्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. यात मुंबई-पुणे महामार्गावर यापूर्वी कोणत्याही वाहतूकदारांकडून डबल डेकर बस गाडी चालवण्यात आली नाही. मुंबई-पुणे महामार्गावरील बोगद्याची उंची व वाहनांची प्रत्यक्ष उंची तपासणे आवश्यक आहे. तसेच सध्याच्या बसगाडय़ाच्या तुलनेत डबल डेकर बसगाडीच्या वेगावर बंधने असल्याचे बसगाडी अपेक्षित वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचण्यास बिलंब होईल, अशा बाबी नोंदवण्यात आल्या आहेत.

परदेशात अशा प्रकारच्या डबल डेकर गाडय़ा चालवल्या जात आहेत. या गाडय़ांमुळे चालकाची आणि वाहकाची शक्ती खर्च होणार नाही. याशिवाय सध्याच्या तुलनेत अधिक प्रवासी वाहतूक करणे सोपे होईल. मात्र या सर्व तांत्रिक बाबी तपासून एसटी महामंडळाच्या आणि प्रवाशांच्या फायद्याचे असल्यास डबल डेकर नक्की चालवली जाईल.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष