कोकणात धावणारी पहिलीवहिली डबलडेकर वातानुकूलित गाडी प्रीमियम दरात चालवल्याने या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आणि अखेर मध्य रेल्वेने आपली ही चूक सुधारली. आता १६ ऑक्टोबरपासून १२ नोव्हेंबपर्यंत दिवाळीसाठी विशेष गाडी म्हणून चालवण्यात येणारी ही गाडी साध्या दरांतच धावणार असून कोकणवासीयांचा प्रतिसाद विचारात घेऊन या गाडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रीमियम गाडीच्या ‘डायनॅमिक’ दरांमुळे प्रवाशांच्या खिशाला पडणाऱ्या भगदाडाबद्दल सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने वाचा फोडली होती. त्यानंतर शिवसेनेने हा प्रश्न रेल्वे मंत्रालयापर्यंत नेल्यावर ही गाडी नेहमीच्या दरांतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
०२००५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही गाडी १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० ऑक्टोबर आणि १, ३, ५, ७, ९ व ११ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ५.३० वाजता निघून संध्याकाळी ४.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर ०२००६ अप करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१ ऑक्टोबर व २, ४, ६, ८, १० आणि १२ नोव्हेंबर रोजी करमाळीहून सकाळी ६.०० वाजता सुटून सायंकाळी ५.४० वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.