भिवंडी येथील भादवड परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राजू शांताराम कोळी (३०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील भादवड परिसरात राहतो. २९ एप्रिल २०१० मध्ये याच परिसरात राहणारी एक महिला काही कामानिमित्त मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्या वेळी तिची अकरा वर्षीय मुलगी घरामध्ये होती तर या मुलीची भावंडे घराबाहेर खेळत होती. याच संधीचा फायदा घेत राजू कोळी हा तिच्या घरात शिरला आणि त्याने घराचा दरवाजा आतमधून बंद केला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून तिची मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारी तिसरे जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. विरकर यांच्यासमोर झाली. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. अ‍ॅड. अशोक खांबकर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद केला. सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य़ मानून न्यायाधीश विरकर यांनी राजूला बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तर हत्येच्या गुन्ह्य़ाखाली जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड, अशी दुहेरी जन्मठेपची शिक्षा सुनावली.