सचिन धानजी

सुमारे सहा हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट; शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी क्षमता वाढवणार

मुलुंड येथील कचराभूमी बंद करण्यात येणार असल्याने कांजूरमार्ग आणि देवनार येथील कचराभूमीवर कचऱ्याचा भार वाढत आहे. मात्र, देवनार येथील कचराभूमीचीही क्षमता आता संपत चालली असून मार्च २०१९पर्यंत शहरातील ८५ टक्के कचरा कांजूरमार्ग येथेच टाकण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईत दररोज ७२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असल्याचा पालिकेचा दावा आहे. या कचऱ्याची विल्हेवाट प्रामुख्याने देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील कचराभूमीवर करण्यात येते. त्यापैकी मुलुंड कचराभूमीतील कचऱ्यावर प्रक्रिया करून जमीन पुन्हा संपादित करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या परवानगीसह अन्य परवानगीअभावी या कामाला सध्या सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काही प्रमाणात कचरा तिथे टाकला जात आहे. तर देवनार भरावभूमीतील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया होत नसल्याने तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६च्या नियमांचे पालन न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानेही महापालिकेला ५ कोटींचा दंड केला आहे.

देवनार कचराभूमीवरील कचऱ्यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी निविदा मागवण्यात येत असली तरी त्याला स्थानिकाचा तीव्र विरोध आहे. देवनारच्या तुलनेत कांजूरमार्ग शास्त्रोक्तपणे प्रक्रिया होत असल्याने आता महापालिकेने याठिकाणी अतिरिक्त कचरा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मार्च २०१९ पर्यंत त्याठिकाणी एकूण कचऱ्याच्या ८५ टक्के कचरा तिथे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात देवनारला कचरा टाकणे बंद होईल.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. ‘ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण सक्तीचे करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागच्या जागीच करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. परंतु मुलुंड बंद करण्यात येत असल्याने देवनार आणि कांजूरमार्ग याठिकाणी अतिरिक्त कचरा टाकला जात आहे. भविष्यात शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कांजूरमार्ग कचराभूमीची क्षमता वाढवली जाईल,’ असे ते म्हणाले.

देवनार कचराभूमीची गरज संपणार?

सध्या या कचराभूमीवर ३२०० मेट्रिक टन एवढा कचरा टाकला जातो. तो कचरा वाढवून ६००० एवढा केला जाणार असल्याचे शंकरवार यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सध्या ७२०० मेट्रिक टन कचरा भराव भूमीत टाकला जातो. त्यामुळे जर ६००० मेट्रिक टन एकटय़ा कांजूरमार्गवर टाकल्यास देवनारला कचरा टाकण्याची गरजच भासणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.