संदीप आचार्य

मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय रुग्णालयांच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी होण्याची गरज असल्याची भूमिका आरोग्य विभागाने घेतली आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात करोना रुग्णांना पहिल्या टप्प्यात तातडीने ऑक्सिजन मिळाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण निश्चित कमी होईल असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत असून आजच्या घडीला महाराष्ट्रासह देशात मेडिकल ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे एक आव्हान बनले आहे. खासकरून महाराष्ट्रात रुग्ण वेगाने वाढत असताना त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील मेडिकल ऑक्सिजनचा सर्वंकष आढावा घेतला असता शासकीय रुग्णव्यवस्थेच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर खासगी रुग्णालयांत झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे रुग्णांना दिलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण योग्य होते का? तसेच गळती पासून अनेक मुद्द्यांची तपासणी होण्याची आवश्यकता असल्याची भूमिका आरोग्य विभागाने घेतली आहे. राज्यात सध्या करोना रुग्णांसाठी प्रतिदिन ६०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत असून अॅक्टिव्ह रुग्णामधील पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. हे प्रमाण राज्यातील एकूण रुग्णांच्या १० टक्के एवढे आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या वापराची माहिती घेतली असता १५,००० रुग्णांसाठी ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व महापालिका रुग्णालयांतील १५००० हजार रुग्णांसाठी नेमका किती ऑक्सिजनचा वापर केला गेला याची माहिती घेतली असता शासकीय व्यवस्थेत १५ हजार रुग्णांसाठी २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर झाल्याचे दिसून आले. शासकीय व खासगी रुग्णव्यवस्थेत १५ हजार रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या वापरातील हा फरक नक्कीच चिंतीत करणारा असून याच्या कारणांची तपासणी होणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व रुग्णालयांना प्रतिदिन नेमका किती ऑक्सिजन लागतो याची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील ६५ ऑक्सिजन भरणा केंद्रांवरही देखरेख ठेवण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाला सांगण्यात आले आहे.

राज्यात ज्या वेगाने करोना रुग्ण वाढत आहे ते लक्षात घेता ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात गरज नजीकच्या काळात लागणार आहे. राज्यात सध्या ५६,२९७ ऑक्सिजन बेड असून यात सरकारी रुग्णालयात २५,५५३ बेड तर खासगी रुग्णालयात २४,०१० बेड आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात ६७३४ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. आज पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली येथे शासकीय रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे अवघड झाल्याचे आरोग्य विभागाच्याच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्य विभागाच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याबाबत आढावा घेण्यात येत असून शासनाने यापुढे राज्यातील ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी तर २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात १०८१ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून आजच ६०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर हा वैद्यकीय उपचारात होत आहे. नजिकच्या काळात हे प्रमाण वाढेल असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. “आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय समिती नियुक्त केली असून प्रत्येक महसुली विभागात ५० ड्युरा सिलिंडर व २०० जम्बो सिलिंडरचा राखीव साठा ठेवण्यास विभागीय आयुक्तांना सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराची माहिती गोळा करण्याबरोबरच ऑक्सिजनची गळती वा अन्य कोणत्या कारणांमुळे ऑक्सिजन वाया जात नाही ना” याची काटेकोर काळजी घेण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.