मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सी यांच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देताना परिवहन विभागाची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुदतवाढ देणार नाही आणि वाहनांवर कारवाई करणार अशी भूमिका घेणाऱ्या परिवहन विभागाने अखेर युनियन्सच्या दबावाला बळी पडून मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे मॅकॅनिकल मीटरच्या बाबत संभ्रमात्मक भूमिका घेतल्यानेच रिक्षा-टॅक्सींच्या रिकॅलिब्रेशनचे त्रांगडे वाढत चालले आहे.
मॅकॅनिकल मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे हे अत्यंत जिकीरीचे आणि वेळकाढू असल्याचे परिवहन विभागाचेच म्हणणे आहे. त्याचप्रमाणे मॅकॅनिकल मीटर ही बाद करून त्याऐवजी ई-मीटर लावण्यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात आदेश काढून १ डिसेंबरपासून ई-मीटर सक्तीची केली आहेत. रिक्षासाठी ई-मीटर लावण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असून टॅक्सीसाठी ३१ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या काळात सर्व मीटर्स ही ई-मीटर्स करण्यात येणार आहेत. अशावेळी मॅकॅनिकल मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचे कोणतेही कारण नव्हते. सर्व मीटर्स ई-मीटर होत असल्यामुळे त्यांचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत नव्हते. उलट अशा रिक्षा-टॅक्सीचालकांना एकदम ई-मीटर लावण्याचाच आग्रह धरण्यात येत होता. तरीदेखील मॅकॅनिकल मीटरला मुदतवाढ देऊन परिवहन विभागाने आणखी गोंधळ निर्माण केला आहे.
रिकॅलिब्रेशनसाठी असलेल्या तीन संस्थांकडून पुरेशा प्रमाणात मीटर्स रिकॅलिब्रेट होत नसल्याची कबुली परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी स्वत:च दिली होती. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचीही मदत घेण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने मध्यंतरी केला होता. मात्र त्यांनीही मदत देण्यास वेगवेगळ्या कारणामुळे असहाय्यता दाखविली होती. ४५ दिवसांच्या मुदतीमध्ये १५ दिवस सुट्टय़ांचे होते आणि ३० दिवस काम सुरू होते असे मुदतवाढ देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले असले तरी प्रत्यक्षात हे सर्व दिवस परिवहन विभागाची विभागीय कार्यालये सुरू ठेऊन रिकॅलिब्रेशनचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, ५० टक्क्यांच्या आसपास सर्व रिक्षा-टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन झाले नाही.    

परिवहन आयुक्त- सचिवांच्या उचलबांगडीची मागणी
मुंबई महानगर परिक्षेत्रातील रिक्षा-टॅक्सींच्या मीटर रिकॅलिब्रेशनबाबत जराही गांभीर्य न दाखविणाऱ्या परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे आणि परिवहन सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी केली आहे. अ‍ॅड. देशपांडे यांनी रिकॅलिब्रेशनच्या मुदतवाढीच्या संदर्भात सांगितले की, सर्व रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन झाल्यावर भाडेवाढ करावी ही मागणी धुडकावून लावत घाईघाईने भाडेवाढ करण्यात आली. ग्राहक पंचायतच्या वतीने ६ ऑक्टोबरला आम्ही पत्र दिले होते. मात्र तरीही भाडेवाढ करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत परिवहन आयुक्त आणि सचिवांनी बेजबाबदारपणा दाखविला आहे. युनियन्सच्या दबावाला बळी पडून आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.