स्वच्छता, आरोग्यविषयक खबरदारीमुळे पार्लरचालकांचा खर्च वाढणार; ग्राहकांना घरपोच सौंदर्यसेवा पुरवण्याचीही तयारी

मानसी जोशी

शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यावर शहरातील इतर व्यवसायांना मान्यता मिळाली असली तरी केशकर्तनालये, सलून आणि स्पा बंद असल्याने यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य कमालीचे अंधारात आहे. यापैकी काही जण ग्राहकांच्या घरी जाऊन, सौंदर्यसेवा पुरवून व्यवसायाला पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु सेवा देताना करोना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची खूपच काळजी घ्यावी लागत आहे. यासाठी त्यांना जादा पदरमोड करावी लागणार असल्याने सौंदर्यसेवांचे शुल्क वाढवावे लागतील, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

घरपोच सेवांमध्ये केस कापणे, रंग करणे, स्ट्रेटनिंग करणे यासह फेशियल, ब्लीचिंग, क्लीन अप, मसाज अशा विविध सेवा देता येतात; परंतु करोनाच्या धास्तीपायी सध्या तरी या सेवेला फारसा प्रतिसाद नाही. दुसरीकडे या सेवाही महाग झाल्या आहेत. ‘ग्राहकांकडे जाताना मुखपट्टय़ा, हातमोजे, पीपीई किट, सॅनिटायझर वापरावे लागते. यासाठी जास्त खर्च होत असल्याने सौंदर्यसेवांच्या दरात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे सौंदर्यसेवांचे सध्याचे दर दुप्पट झाले आहेत,’ असे ‘ईमेज’ ब्युटी पार्लरच्या भक्ती शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे जी मंडळी या सेवा आधीपासून घरपोच देत होते, त्यांचाही व्यवसाय कमी झाला आहे. ‘मी अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या घरी जाऊन सौंदर्यसुविधा देत आहे. त्यांच्या घरी गेल्यावर आम्ही निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेची योग्य काळजी घेतो. त्यात बराच वेळ जातो. इतर वेळेस दिवसाला मी सहा ग्राहकांच्या घरी जायचे. आता मात्र आठवडय़ातून एक ग्राहकाकडून बोलावणे येते. महिन्याला ३० ते ४० हजारांवरील व्यवसाय आता १ ते २ हजार रुपयांवर आला आहे,’ असे ब्युटिशियन अर्चना जाधव यांनी सांगितले.

‘टाळेबंदीमुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. माझ्याकडे तीन महिन्यांचे दुकानाचे भाडे भरण्यास पैसे नाहीत. त्यामुळे दुकानाच्या बाहेर बनावट आभूषणे विकू न एका महिन्याचे भाडे कसे तरी भरले. पतीचीही नोकरी गेली आहे. टाळेबंदीत सौंदर्य प्रसाधने आणि साहित्य मिळत नाही. काही उत्पादने घरच्या  घरी बनवून वापरत आहे,’ असे भाग्यश्री सोनावणे यांनी सांगितले. श्रद्धा शिंदे हिचे एल्फिन्स्टन येथे ब्युटिपार्लर असून, ती महिलांना मेकअपचे ऑनलाइन प्रशिक्षण देते. सध्या टाळेबंदीमुळे त्यांच्या घरी जाणे शक्य नसल्याने घरच्या घरी करता येण्यासारखे मेकअप, आय ब्रो, मसाज, फेशियल शिकवते आहे. अनेक ग्राहकांनी घरी येण्यासाठी विचारणा केली. मात्र मीच ते टाळते आहे, असे तिने सांगितले.

सौंदर्य प्रसाधने आणि साहित्यांची कमतरता

क्रॉफर्ड मार्केट, भायखळा, खार, सांताक्रूझ आणि दादर येथे सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणारी दुकाने मोठय़ा संख्येने आहेत; परंतु टाळेबंदीमुळे मालच उपलब्ध नसल्याने काम सुरू करण्यात अडचणी आहेत.