मुंबईत दिवसभरात १,६०० करोनाबाधित; ४९ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील करोनास्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात येत असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तीन महिन्यांवर गेला आहे. दरम्यान, रविवारी १,६०० रुग्णांची नोंद झाली असून, ४९ जणांचा मृत्यू झाला.

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत दरदिवशी २००० च्या आसपास रुग्ण आढळून येत असताना गेल्या आठवडय़ापासून दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. रविवारी १६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,४१,९३९ वर पोहोचली आहे. त्यापैकी २,१०,८१३ रुग्ण करोनामुक्त झाले असून, रविवारी २७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांचा दर ८७ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. १८,०६२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापैकी १०,०८७ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर ७३०४ रुग्णांना लक्षणे आहेत. १३२६ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.

रविवारी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९७३१ वर गेली आहे. ४९ मृतांपैकी ३४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ४२ पुरुष व ७ रुग्ण महिला होत्या. ३१ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. मुंबईतील मृत्यूदर सध्या ४ टक्क्य़ांवर आहे.

मुंबईत आतापर्यंत १३,५४,१८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दर दिवशी १६ ते २० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य दिलेले असताना सध्या दिवसभरात कमाल १५ हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत. शनिवारी १३४०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १५ टक्के अहवाल बाधित आढळले आहेत.

मशीद बंदर, भेंडीबाजार, डोंगरीमध्ये सर्वात कमी रुग्ण

’ सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत करोनाबाधितांचे प्रमाण वाढत असतानाच मशीद बंदर, भेंडीबाजार, डोंगरी, पायधुनीचा भाग असलेल्या ‘बी’ विभागातील रुग्णसंख्या मात्र नियंत्रणात आहे. या भागातील एकूण बाधितांची संख्या दोन हजारांच्याही आत आहे.

’ मशीद बंदर, डोंगरी, भेंडीबाजार, पायधुनी, महम्मद अली रोड असा गजबजलेला भाग असलेल्या ‘बी’ विभागात करोना रुग्णांची संख्या गेल्या सहा महिन्यांत सर्वात कमी राहिली आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, विलगीकरण, वेळेत केलेल्या चाचण्यांमुळे ही रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

’ मुंबईतील अन्य सर्व विभागांतील एकूण रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेलेली आहे. बोरिवलीत तर ही संख्या १६ हजारांच्या पुढे आहे. अन्य भागांमध्ये दररोज १०० ते दीडशे रुग्ण आढळत असताना ‘बी’ विभागात मात्र रोज केवळ १० ते २० रुग्णांची नोंद होत आहे.

बोरिवलीतील एकूण रुग्णसंख्या १६ हजारांवर : बोरिवलीतील रुग्णसंख्येचा दर आटोक्यात आलेला असला तरी एकूण बाधितांची संख्या १६ हजारांवर पोहोचली आहे. सध्या या भागात मुंबईतील सर्वाधिक म्हणजे २४२१ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या आठवडय़ातील आकडेवारी पाहता बोरिवलीतील रुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. मात्र गोरेगावमध्ये रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. या भागात आता दर दिवशी १००च्या पुढे रुग्णांची नोंद होऊ लागली आहे.