कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी कोलाड येथे होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी पाच वर्षे लागतील. यासाठी दहा हजार ७५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कोकणातून दक्षिण भारतात जाणाऱ्या गाडय़ांसाठी कोकण रेल्वेवर एकच मार्ग आहे. त्यामुळे अनेक गाडय़ांना ‘थांबा’ मिळतो आणि त्यात प्रवाशांना हाल सोसावे लागतात. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील नोकरदारांसाठी विशेष गाडय़ांमध्ये तासन्तास ताटकळत बसावे लागते.
काही वर्षांपासून तर गणेशोत्सवात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १२ ते १६ तास रेल्वेतच बसून काढावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एक मार्गिकेचा मालगाडय़ांच्या वाहतुकीलाही फटका बसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगाडी वाहतुकीतही एक मार्गिकेचा अडथळा ठरला आहे. दुपरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम रोहा स्थानकापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र त्यापुढे कोकण रेल्वेवर ही प्रक्रिया सुरू झालेली नव्हती.

’विद्युतीकरणासाठी ७५० कोटी, तर दुपदरीकरणासाठी १० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद
’प्रकल्पासाठीचा निधी रेल्वेच्या मदतीविना उभारण्यात येईल.
’प्रकल्प निधीसाठी कोकण रेल्वेने भारतीय जीवन विमा महामंडळाकडून कर्ज घेतले आहे. कर्जावर ९.५ टक्क्यांऐवजी महामंडळ ८.७५ टक्के व्याजदर आकारणार आहे. यापैकी २५० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी स्पष्ट केले.