महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत पूर्वीसारखा लढाऊपणा राहिलेला नाही. दलित नेतृत्व सुखासीनतेच्या मागे लागले आहे, आंबेडकरी चळवळ प्रभावहीन होण्याची ही चिन्हे आहेत, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केली. ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’च्या व्यासपीठावरून आंबेडकरी चळवळीच्या सद्यस्थितीपासून देशातील राजकीय व्यवस्थेच्या ‘शिरहीन’ अवस्थेपर्यंत विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
दलित पँथर ही दिशाहीन चळवळ होती, जात सर्वानाच फायद्याची म्हणून कुणीच ती सोडायला तयार नाही, अशी नव्या चर्चेला तोंड फोडणारी विधाने करतानाच विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष म्हणजे देशाचे नेते नव्हेत, देश सध्या नेतृत्वहीन व दिशाहीन झाला आहे. माओवादी संघटना जंगलातून बाहेर पडून लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्या, तर व्यवस्था बदलण्यासाठी नवा पर्याय निर्माण होऊ शकतो, अशी मतेही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राजकारण दाऊद इब्राहिम व बिल्डरांच्या हातात आहे, असा सनसनाटी आरोपही त्यांनी या वेळी केला. बाबासाहेबांच्या घराण्यातील जन्माचे फायदे-तोटे, आंबेडकरी चळवळीचा प्रवास आणि सध्याची अवस्था, भारतातील प्रस्थापित राजकीय पक्षांची आर्थिक, सामाजिक व परराष्ट्र धोरणे, माओवाद्यांची वाढती ताकद, मायावतींचे व्यक्तिकेंद्रित राजकारण, काँग्रेसची सुपारी घेऊन झालेले रिपब्लिकन ऐक्य, अशा विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा आणि राजकीय आरक्षण रद्द करा, या मागणीवर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माधिष्ठित राजकारण करणारा भाजप आता संपत चालला आहे, संघाच्या शाखा आता फक्त फेसबुकवर व ट्विटरवर भरत आहेत, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

रोखठोक आंबेडकर
*    भाजपने मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावीच, राजकीय समीकरणे बदलतील.
*    माओवाद्यांनी लोकशाही मार्गाने व्यवस्था परिवर्तनासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
*    मायावतींकडून अपेक्षाभंग झाला, दलित राजकारण प्रभावहीन होत असल्याचे निदर्शक
* काँग्रेसने आंबेडकरी चळवळ फोडण्याचा कायम प्रयत्न केला.
*    दलित पॅंथर ही भावनिक व दिशाहीन चळवळ होती, म्हणून ती लगेच संपली.
* जात सर्वानाच फायद्याची वाटते, म्हणून त्याविरुद्ध उठाव होत नाही.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या गप्पांचा सविस्तर वृत्तांत येत्या रविवारी