|| अमर सदाशिव शैला

गेल्या १८ महिन्यांत २८६ शोरूम बंद; वाहन विक्री घटल्याने सणासुदीतही विक्रेते चिंतेत

गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीची झळ वाहननिर्मात्या कंपन्यांना बसत असताना याचा सर्वाधिक परिणाम वाहन कंपन्यांच्या वितरक व अधिकृत विक्रेत्यांवर दिसून येत आहे. मार्च २०१९ मधील आकडेवारीनुसार त्याआधीच्या १८ महिन्यांत मुंबई महानगर क्षेत्रातील २८६ वितरकांची दुकाने बंद पडली असून तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

वाहन व्यवसायातील मंदी गेल्या काही महिन्यांत आणखी तीव्र झाली असल्याने गणेशोत्सवापासून सुरू होत असलेल्या सणासुदीच्या हंगामाबाबतही वितरक साशंक आहेत.

वाहन वितरकांची संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन’च्या (फाडा) आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जून महिन्यात वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत २०.३९ टक्क्यांची घट झाली. गेल्या वर्षी या महिन्यात १ लाख ९६ हजार ८६७ वाहनांची विक्री झाली होती. त्यात घट होऊन या वर्षी ती १ लाख ५६ हजार ७१६ इतकी खालावली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०१९) देशभरातील वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ‘फाडा’च्या आकडेवारीनुसार या वर्षी फेब्रुवारीपासून सातत्याने वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत घट होत आहे.

‘वाहन क्षेत्राला मागील दहा महिन्यांपासून मंदीचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी जवळपास ७ ते ८ टक्के कर्मचारी कपात केली आहे.  मार्च २०१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार १८ महिन्यांमध्ये सुमारे २८६ शोरूम बंद कराव्या लागल्या आहेत. अनेकांनी आपल्याकडील गाडय़ांचा साठाही कमी केला आहे,’ अशी माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष आशीष काळे यांनी दिली.

वाहन वितरकांची स्थिती जाणून घेण्यासाठी, लोअर परळ येथील एका शोरूममध्ये विचारणा केली असता गेल्या सहा महिन्यांपासून या शोरूममधील वाहनांच्या विक्रीत तब्बल ६० टक्क्यांची घट झाल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. विक्री कमी होत असताना वितरकांचा खर्च मात्र वाढत असल्याने अनेक वितरकांनी आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे, तर अनेकांनी कामगार कपात करण्यास सुरुवात केली आहे. दादर परिसरातील एका शोरूममध्ये गेल्या काही महिन्यांत तीन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. ‘मागील एका वर्षांपासून विक्रीत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. आधी महिन्याला १५ ते २० कार विकल्या जात. आता २ ते ३ गाडय़ांची विक्री होते. व्यवसाय कमी झाल्याने तीन कामगारांना कमी केले,’ असे स्पष्टीकरण विनंती ऑटोचे मालक केतन पवार यांनी दिले.

वाहन बाजारात आलेली मंदी गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामात कमी होईल, अशी काही वितरकांना आशा आहे. ‘आता आमची सर्व मदार सणासुदीतील वाहन विक्रीवर आहे. तो काळही मंदीत गेला तर, मात्र या क्षेत्रात मोठी रोजगार कपात पाहायला मिळेल,’ असे मत संदीप जगताप या विक्रेत्याने व्यक्त केले.

तोटय़ाची कारणे

वस्तू व सेवा करांतील वाढ, वाढलेले नोंदणी शुल्क, पाच वर्षांच्या वाहनविम्याची सक्ती, नवीन नंबर प्लेटसाठीचा खर्च यामुळे वाहनांच्या ‘ऑन रोड’ किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. परिणामी ग्राहक वाहनखरेदीबाबत सावध पवित्रा घेत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ‘बाजारातील पैशाचा प्रवाह कमी असणे, विमा किमतीतील वाढ, वित्तसंस्थांचा आखडता हात, पेट्रोल- डिझेलच्या किमतीतील वाढ यामुळे वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे, असे ‘फाडा’चे अध्यक्ष आशीष काळे यांनी सांगितले.