बनावट जातवैधता प्रमाणपत्रप्रकरणी अनेक गुन्हे दाखल

मुंबई : राखीव कोटय़ातून एमबीबीएसला बेकायदा प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉ. अब्दुल वहाब हाजी दाऊद मिर्झा याला गुन्हे शाखेने इंदूरमधून अटक केली. डॉ. मिर्झा गेल्या काही वर्षांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देत होता.

मुंबईच्या जेजे मार्ग पोलीस ठाण्यात तीन, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दोन, तर भोईवाडा, नागपाडा, सायन, खेरवाडी पोलीस ठाण्यात डॉ. मिर्झाविरोधात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. त्याशिवाय धुळे, कोल्हापूर येथेही त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत. २०१६मध्ये त्याला अटक झाली होती. नंतर जामिनावर बाहेर असताना मधल्या काळात पुन्हा त्याने बनावट जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देणे सुरू ठेवले. त्यामुळे त्याच्यावरील  गुन्ह्य़ांची संख्या वाढली.  तो पुन्हा पळून गेल्याने त्याला अटक करण्याची जबाबदारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकावर(सीआययू) सोपवली. पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या देखरेखीखाली सहायक निरीक्षक रियाझ काझी, पोलीस हवालदार साहेबराव पवार, पोलीस नाईक शिंदे आणि पथकाने शोध सुरू केला. डॉ. मिर्झा क्षयरोग आणि हृदयरोगतज्ज्ञ असल्याने राज्य-परराज्यात सेवा देत असावा, या अंदाजावर पथकाने चौकशी सुरू ठेवली. अखेर इंदूरच्या इंडेक्स वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मिर्झा कार्यरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. सहायक निरीक्षक काझी, हवालदार पवार तेथे पोहोचले तेव्हा डॉ. मिर्झा निसटण्याच्या तयारीत होता.