भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अवमानकारक मजकूर प्रसिध्द झाल्यामुळे दलित कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा ठाणे- बेलापूर मार्गावर उत्सफूर्ते रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी सकाळी काही काळ रस्ता रोको आंदोलन करुन वाहनचालकांना वेठीस धरले. फेसबुकवर हा मजकूर डाऊनलोड करणाऱ्याला २४ तासात अटक न केल्यास पुन्हा असेच आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
बुलढाण्याहून डॉ. बाबासाहेब यांची बदनामी करणारा मजकूर शुक्रवारी फेसबुकवर जगप्रसिध्द झाला. त्याचे पडसाद तुर्भे स्टोअर या दलित वसाहतीत उमटले. शे- दीडशे दलित कार्यकर्त्यांनी रात्री दहा वाजता ठाणे बेलापूर मार्गावर येऊन घोषणाबाजी केली. वाहनांचे टायर जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मार्गावर दोन तास वाहतूक कोंडी झाली. तिचे परिणाम रात्री एक वाजेपर्यंत वाहनचालकांना भोगावे लागत होते. उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी घटनास्थळी धाव घेतली पण त्यांची गाडीही वाहतूक कोंडीत अडकली होती. अखेर तुर्भे पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करुन माघारी पाठविले. याच आंदोनलनाची छोटी पुर्नरावृत्ती आज सकाळी नऊच्या सुमारास झाली. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको झाला आणि पोलिस उपायुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. २४ तासाच्या आत त्या फेसबुक युजर्सला अटक करा अन्यथ: पुन्हा ठाणे बेलापूर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावर अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात केली आहे.