छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश शुक्रवारी होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात असाही कयास व्यक्त होतो आहे. अमोल कोल्हे यांच्यासह दोन माजी आमदारांचाही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे पक्षप्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावळेी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.
लोकसत्ता ऑनलाइननेही अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांचा मोबाईल उचललाच नाही. आता शुक्रवारी नेमकं काय होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या वेळी दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. अमोल कोल्हे यांच्या खास वकृत्वशैलीमुळे श्रोते त्यांचे भाषण आवर्जून ऐकत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारीही अमोल कोल्हे यांनी स्वीकारली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 10:38 pm