मुंबई : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत असून कर्करोगापेक्षाही जलदगतीने पसरणाऱ्या या आजाराच्या उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी करोना कृतिदलात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अनियंत्रित साखरेची पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांचा अतिवापर या मुळे म्युकरमायकोसिस बुरशीजन्य संसर्गाचे बाधा होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे.  या रुग्णांचे निदान वेळेत करणे आव्हानात्मक असून उपचारही योग्यरितीने करणे गरजेचे आहे. तेव्हा राज्यभरातील डॉक्टरांना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी करोना कृतिदलामध्ये ठाण्याचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.