News Flash

लंडनमधील बाबासाहेबांचे घर संग्रहालयाचा दर्जा गमावणार?

लंडनच्या 'द कॅमडेन काऊन्सिल' या स्थानिक महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

लंडनमधील बाबासाहेबांचे घर संग्रहालयाचा दर्जा गमावणार?
लंडन : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडनस्थित घर.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने विकत घेऊन त्याचे रुपांतर संग्रहालयात केले आहे. मात्र, आता हे संग्रहालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. लंडनच्या ‘द कॅमडेन काऊन्सिल’ या स्थानिक महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने काऊन्सलच्या या निर्णयाविरोधात स्थानिक कोर्टात धाव घेतली आहे. सिंघानिया आणि कंपनी ही कायदाविषयक संस्था शासनाची बाजून कोर्टात मांडणार आहे. या प्रकरणावर २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

‘द कॅमडेन काऊन्सिल’ने आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, शांतता झोनमध्ये असलेल्या या ऐतिहासिक घराचे संग्रहालयात रुपांतर झाल्यापासून येथे भेट देणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांच्या गर्दीचा त्रास या घराच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना होत असून तशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे २०५० चौफूट जागेत असलेल्या या चार मजली घराचे पुन्हा रहिवासी जागेत रुपांतर झाले पाहिजे, म्हणजेच येथील संग्रहालय दुसरीकडे हलवण्यात यावे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले हे घर सप्टेंबर २०१५ मध्ये २.२५ दशलक्ष डॉलर्सला विकत घेतले होते. त्यानंतर घराच्या नुतनीकरणासाठी १ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आला होता. नुतनीकरणानंतर या इमारतीवर एक निळा फलक लावण्यात आला असून यामध्ये घराचे महत्व विषद करण्यात आले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना आंबेडकर १९२१ ते १९२२ या एक वर्षांच्या काळात येथे वास्तव्यास होते.

नोव्हेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी या घराला भेट दिली होती. या घराच्या तळमजल्यावर असलेल्या दोन स्वागत खोल्यांचे प्रदर्शन केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. तसेच येथील एका छोट्या खोलीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर या खोलीतील एका भिंतीवर भारताच्या संविधानाची प्रास्तावनाही लावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली या घराची व्यवस्था पाहिली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 4:38 pm

Web Title: dr b r ambedkars house in london may lose its museum status aau 85
Next Stories
1 “चिदंबरम यांच्यावरील कारवाईमागे केंद्र सरकार नाही”
2 जम्मू-काश्मीरमध्ये काहीतरी गंभीर घडत असून सरकार ते लपवतंय – गुलाम नबी आझाद
3 सीबीआयची चिदंबरमना अटक करण्याची पद्धत देशासाठी लाजीरवाणी – स्टालिन
Just Now!
X