26 February 2021

News Flash

डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याचा उल्लेख

मृत्यू दाखल्यात दुरुस्तीची नातवाची विनंती

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर 

|| प्रसाद रावकर

मृत्यू दाखल्यात दुरुस्तीची नातवाची विनंती; पालिका म्हणते, पुरावे द्या! 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या मृत्यू दाखल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याचा उल्लेख असल्याने त्यात दुरुस्ती करण्याची विनंती केल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याबाबतचे पुरावे मागितले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नवी दिल्लीत झाले. त्यामुळे मृत्यू दाखल्यावर तशी दुरुस्ती करावी, त्याचबरोबर त्यांच्या नावापुढे ‘डॉ.’ ही उपाधी लावावी, त्यांच्या आई-वडिलांचे नावही दाखल्यात समाविष्ट करावे, अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी पालिकेकडे केली आहे. मात्र याबाबतचे पुरावे सादर करण्याची सूचना करून पालिकेने हा अर्ज गुंडाळून ठेवला आहे. त्यामुळे नव्या वादाची चिन्हे आहेत.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्य़ातील महू या लष्कर छावणीत झाला. त्यांचे आजोबा लष्करात शिपाई होते. त्यामुळे बाबासाहेबांचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी उच्चशिक्षण घेतले. त्यांनी दलितांना माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून चळवळी केल्या. भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. परंतु त्यांचे पार्थिव दर्शनासाठी मुंबईत आणण्यात आले होते. अंत्यसंस्कारही मुंबईतच करण्यात आले.

मुंबई महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचा दाखला तयार केला असून त्यावर त्यांचे नाव श्री. भीमराव रामजी आंबेडकर असे आहे. तसेच त्यांचा मृत्यू मुंबईत झाल्याचा उल्लेखही दाखल्यावर आहे. परंतु दाखल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आई आणि वडिलांच्या नावाचा उल्लेख नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी पालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळविली होती. त्यामुळे मृत्यू दाखल्यातील भीमराव रामजी आंबेडकर नावापुढे ‘डॉ.’ ही उपाधी लावण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या नातवांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सरदार मेजर रामजी मालोजी सकपाळ आणि आई भीमाबाई रामजी सकपाळ यांचा उल्लेख मृत्यू दाखल्यात करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे झाले. मात्र पालिकेने मृत्यू दाखल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण मुंबईमध्ये झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यात दुरुस्ती करून तेथे नवी दिल्ली असा उल्लेख करण्याची मागणी भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केली आहे.

मात्र या संदर्भातील कागदपत्रे पुराव्यादाखल सादर करण्याची सूचना ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना केली. महापरिनिर्वाणाचा उल्लेख असलेल्या पुस्तकातील उताऱ्यांची प्रत पालिकेला सादर करण्यात आली आहे. मात्र तो पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्यास पालिका तयार नाही.

पालिकेने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वंशावळीच्या आधारे त्यांच्या आई-वडिलांचे नाव मृत्यू दाखल्यात समाविष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही मृत्यू दाखल्यात पालिकेने कोणतीही कुरकुर न करता दुरुस्ती करायला हवी.    – अमेय गुप्ते, लेखक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू दाखल्यात दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पुराव्यादाखल सादर करण्याची सूचना त्यांच्या वारसदारांना करण्यात आली आहे.    – अनिता इनामदार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘एफ-दक्षिण’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:04 am

Web Title: dr b r ambedkars mahaparinirvan
Next Stories
1 गुजरातमध्ये परप्रांतीय हटाओ मोहिमेत काँग्रेसचा हात!
2 पोलिसांवरील अतिरिक्त कामांचा भार कमी करा!
3 ‘लोकसत्ता ९९९’ला विक्रोळीत उदंड प्रतिसाद
Just Now!
X