26 February 2021

News Flash

डॉ. आंबेडकर चरित्रातील अज्ञात जर्मन दुवा!

जर्मनीतील शिक्षणासाठी सादर केलेले स्वयंमाहितीपत्र उपलब्ध

डॉ. आंबेडकरांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी तिथल्या प्रशासनास लिहिलेले पत्र.

जर्मनीतील शिक्षणासाठी सादर केलेले स्वयंमाहितीपत्र उपलब्ध

अखंड ज्ञानासक्ती आणि ग्रंथप्रेम ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील दोन ठळक वैशिष्टय़े. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ते मानववंशशास्त्र, धर्म, कायदा अशा अनेक विद्याशाखांचा अभ्यास.. मराठीसह हिंदी, इंग्रजी, पाली, पर्शियन आदी भाषांवर प्रभुत्व.. जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन आकारलेली ज्ञानदृष्टी.. या साऱ्याशी त्यांच्याविषयीच्या चरित्रपर लेखनातून आपण परिचित असतो. यात आजवर अज्ञात राहिलेल्या आणखी एका पैलूची भर घालणारे संशोधन पुढे आले आहे. ते म्हणजे डॉ. आंबेडकरांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी तिथल्या प्रशासनास लिहिलेले पत्र. अस्खलित जर्मन भाषेत लिहिलेल्या या स्वयंमाहितीपत्रामुळे डॉ. आंबेडकर चरित्रातील अज्ञात दुवा संशोधकांस उपलब्ध झाला आहे.

१९१३ मध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवल्यावर डॉ. आंबेडकरांनी पुढे १९१७ साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. केली. त्यानंतर जून १९२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम.एस्सी. करून, तिथेच ऑक्टोबर १९२२ मध्ये त्यांनी आपला ‘द प्रॉब्लेम ऑफ द रूपी’ हा प्रबंध सादर केला. त्यासाठी १९२३ मध्ये त्यांना डी. एस्सी. पदवीने गौरवण्यात आले. लंडनमध्ये हे शिक्षण सुरू असतानाच तिथल्या ग्रेज इनमधून ते बॅरिस्टरही झाले. हा डॉ. आंबेडकरांच्या विद्यार्थिदशेतील महत्त्वाचा काळ होता. याच सुमारास त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही प्रवेश घ्यायचे ठरवले होते. यासाठी ते १९२२ च्या एप्रिल-मेमध्ये व पुन्हा १९२३ साली सुमारे तीन महिने जर्मनीत राहिलेही होते, असा उल्लेख त्यांच्यावरील चरित्रपर लेखनात आला आहे. त्याविषयीचे अस्सल पुरावे मात्र उपलब्ध नव्हते. परंतु जर्मनीतील शिक्षणप्रवेशासाठी सादर केलेले डॉ. आंबेडकरांच्याच हस्ताक्षरातील स्वयंमाहितीपत्र उपलब्ध झाल्याने आता आंबेडकर चरित्रातील रिकाम्या जागा भरण्यास मदत होणार आहे.

जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रवेशासाठी २५ फेब्रुवारी १९२१ रोजी डॉ. आंबेडकरांनी बर्लिनमधील विज्ञान, कला आणि सार्वजनिक शिक्षण खात्याला उद्देशून लिहिलेले हे पत्र आहे. त्यात त्यांनी जन्मतारीख, धर्म, शिक्षण आदींविषयीचा तपशील सादर केला आहे. याशिवाय बॉन विद्यापीठातील भारतविद्या आणि तुलनात्मक भाषाविज्ञान विभागाचे प्रा. हेरमान् याकोबी यांच्या सहकार्यामुळे आपणांस बॉन विद्यापीठात पीएच.डी.चा प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हे पत्र जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्राच्या अभ्यासिका मारेन बेल्विंकेल् शेम्प यांच्या संशोधनातून उपलब्ध झाले आहे. कानपूरमधील मिलकामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केलेल्या शेम्प यांनी दलित चळवळीवरही अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांनीच डॉ. आंबेडकरांच्या जर्मनीतील शिक्षणाविषयीची ही अज्ञात माहिती २००३ मध्ये समोर आणली. शेम्प यांच्या संशोधनानुसार, अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी २९ एप्रिल १९२१ रोजी बॉन विद्यापीठात डॉ. आंबेडकरांचे नाव नोंदवण्यात आले. परंतु तिथे ते एकाही तासिकेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे १२ जानेवारी १९२२ रोजी त्यांचे नाव विद्यापीठ नोंदवहीतून वगळण्यात आले. त्यामुळे बॉनमधून शिक्षण घ्यायची डॉ. आंबेडकरांची मनीषा अपूर्णच राहिली.

प्रा. हेरमान् याकोबी व डॉ. आंबेडकर

बॉन विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यात प्रा. हेरमान् याकोबी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. आंबेडकरांनी या पत्रात लिहिले आहे. प्रा. याकोबी हे बॉन विद्यापीठाच्या भारतविद्या (इंडॉलॉजी) व तुलनात्मक भाषाविज्ञान विभागाचे १८८९ ते १९२२ या काळात प्रमुख होते. भारतविद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांचा त्यांच्या शिष्यगणांमध्ये समावेश होता. प्रा. याकोबी यांच्याशी डॉ. आंबेडकरांचा परिचय कसा झाला, हे मात्र अद्याप गूढच राहिले आहे. १९१३-१४ मध्ये प्रा. याकोबी कलकत्ता विद्यापीठात आले होते, पण त्यासुमारास डॉ. आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होते. त्यामुळे या काळात या विद्वद्द्वयांची भेट होणे अशक्य होते. डॉ. आंबेडकरांच्या जर्मन रहिवासादरम्यान त्यांचा प्रा. याकोबींशी परिचय झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, परंतु सदर पत्र हे त्याही आधीचे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष या दोहोंमधील पत्रव्यवहार उपलब्ध झाल्यास, त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण तर कळेलच; शिवाय डॉ. आंबेडकरांच्या चरित्रातील अनेक अज्ञात पैलूही प्रकाशात येऊ शकतील.

भाषा आणि रचना दोन्ही दृष्टींनी हे पत्र अभ्यासण्याजोगं आहे. समर्पक, मुद्देसूद आणि नेमक्या शब्दांत केलेली मांडणी हे तर बाबासाहेबांसारख्या खंद्या बॅरिस्टरचं वैशिष्टय़ आहेच, पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो. मोजके पण चपखल बसणारे शब्द, योग्य क्रियापदं. काही फापटपसारा नाही, अलंकारिक भाषाप्रयोग नाहीत. तरीही हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमानं सादर केली आहे. जर्मन भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केली, तेही ऐच्छिक विषय म्हणून. पण या भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे आहे. संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही. सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यये ते अगदी लीलया वापरून गेले आहेत. १९२१ साली प्रचलित असलेल्या जर्मन भाषेतले, एव्हाना कालौघात विरून गेलेले काही शब्द वाचताना आनंद वाटतो. उदा. inskribieren म्हणजे नावनोंदणी करणे, gesuch म्हणजे नम्र विनंती, शिवाय मायना- lobliche behorde- अर्थात प्रशंसनीय अधिकारी जनहो! आणि पत्राच्या शेवटी zeichne ich- मी स्वाक्षरी करतो, असे जाहीर करून केलेली सही हे वाचताना मौज वाटते.   जयश्री हरि जोशी, जर्मन भाषातज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2017 12:33 am

Web Title: dr babasaheb ambedkar autobiography marathi articles
Next Stories
1 उत्तरपत्रिकांची सुरक्षितता धोक्यात
2 बीड, अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांडांची उकल
3 १९७१च्या जनगणनेनुसारच लोकसभा मतदारसंघांची संख्या २०२६ पर्यंत कायम राहणार !
Just Now!
X