25 April 2019

News Flash

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमसैनिकांची चैत्यभूमीवर गर्दी, प्रशासनाकडून विशेष सोय

लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क मैदानात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था पुरवण्यात आली आहे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

अनेक अनुयायी एक ते दोन दिवस आधीच येऊन मुंबईत मुक्काम करत असतात. अशा अनुयायांसाठी शिवाजी पार्क मैदानात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. महापालिकेच्या सात शाळांमध्ये अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेस्टतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजगृह’ हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 301 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. तसंच शिवाजी पार्क आणि मैदान परिसरात 18 फिरती शौचालयं, रांगेत उभे असणाऱ्यांसाठी चार फिरती शौचालयांची सुविधा देण्यात आली आहेत. तसंच पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स उभे करण्यात आले आहेत.

अनेक अनुयायांना मोबाइल फोन रिचार्ज करण्याची समस्या भेडसावत असते. त्यांच्यासाठी 300 पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.

अनुयायींना दादरला पोहोचता यावं यासाठी मध्य रेल्वेकडू रात्रीच्या वेळी विशेष लोकलची सुविधा देण्यात आली.
गाड्यांचं वेळापत्रक :
– दादर-ठाणे विशेष लोकल मध्यरात्री १.१५ वा.
– दादर-कल्याण विशेष लोकल मध्यरात्री २.२५ वा.
– दादर-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३ वा.
– कुर्ला-दादर विशेष लोकल रात्री १२.४५ वा.
– कल्याण-दादर विशेष लोकल रात्री १ वा.
– ठाणे-दादर विशेष लोकल रात्री २.१० वा.
– हार्बरवर कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल रात्री २.३० वा.
– कुर्ला-पनवेल विशेष लोकल रात्री ३ वा.
– कुर्ला-वाशी विशेष लोकल पहाटे ४ वा.
– वाशी-कुर्ला विशेष लोकल रात्री १.३० वा.
– पनवेल-कुर्ला विशेष लोकल रात्री १.४० वा.
– मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३.१० वा.

याशिवाय अनुयायांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. तसंच बसच्या पासची सोयदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. शहरी प्रवासासाठी ५० रु., उपनगरीय प्रवासासाठी ६० रु., संपूर्ण प्रवासासाठी ९० रुपयांचा मॅजिक पास आहे. हे विशेष तिकीट असल्याने त्यासाठी ओळखपपत्राची आवश्यकता लागणार नाही.

 

First Published on December 6, 2018 3:08 am

Web Title: dr babasaheb ambedkar mahaparinirvan day