भायखळ्याच्या राणीबागेतलं भाऊ दाजी लाड संग्रहालय. त्यात सुदर्शन शेट्टी या जगभर कीर्ती मिळवलेल्या विचारी दृश्यकलावंताचं प्रदर्शन. ते कुतूहल म्हणून तरी पाहाच.

आणि हो, हे कुतूहल स्वतबद्दल, स्वतच्या आणि इतरांच्या आयुष्यांबद्दल, जीवनाच्या अर्थाबद्दल वगैरे असलं तर फारच बरं. प्रचंड आकाराचं एक लाकडी वास्तु-शिल्प आणि त्याला जोडून एक फिल्म, अशा स्वरूपाच्या या प्रदर्शनातून हे जीवनाबद्दलचं कुतूहल शमवणारं एक ‘निर्गुणी’ उत्तर मिळेल. पण समजा तसलं कुतूहलच नसलं, तर सेल्फी काढण्यासाठी छान स्पॉट आहे म्हणून तरी जा! सुदर्शननं कारागिरांकरवी घडवून, काही ठिकाणचे जुने खांब आणि जुन्या वस्तू आणून इथं जे काही घडवलं आहे, ते पाहून प्रत्येकाला जुनेपणा, नित्यनवं आयुष्य, रोजचा उत्फुल्ल दिवस आणि उदास भासणारा गतकाळ, याबद्दल काही ना काही विचार करावासा वाटेल.. कारण या वास्तुशिल्पात आपण वावरू शकतो. इथं अगदी छपरावरसुद्धा चढू शकतो, चालू शकतो.. जुनाट अंधाऱ्या खोलीत डोकावू शकतो, हवेशीर मेघडंबरीखाली बसू शकतो.. आणि मग आपण फिल्म पाहायला जातो तेव्हा लक्षात येतं की बाहेरचं वास्तुशिल्प हाच या फिल्मचा ‘सेट’ आहे. फिल्म आपल्या काळातली आहे, पण हे लोक कुठेही, कधीही जन्मले वा मेले असते, तर हेच करू शकले असते. मग आत्ताचंच जगणं खरंच नवं आहे का? जगण्याला अर्थ आहे, पण आपल्याआधीचे बाकीचेसुद्धा अस्सेच जगले म्हटल्यावर तो अर्थ आपल्याला शून्यवत् वाटू लागतो का? या विचारात असतानाच फिल्म संपते आणि कुमार गंधर्वानी गायलेलं गोरखनाथ-रचित निर्गुणी भजन सुरू होतं : ‘‘शून्य घर शहर, शहर घर बस्ती..’’ तोवर आत्मप्रत्ययाचा आनंद आपल्यापैकी अनेकांना आलेला असू शकतो आणि जगणं ही शून्य-अर्थाची धडपड असली तरी ती शील सांभाळून ती आपल्याला करायचीच आहे, हेही ध्यानी आलेलं असू शकतं!

अगदी रोजच्याच जगण्याबद्दल असूनही आध्यात्मिक अनुभव देणाऱ्या या कलाकृतीबद्दल मराठीत सर्वाच्या आधी, ‘लोकसत्ता- लोकरंग’मधील ‘आजकालच्या कलाकृती’ या सदरात १४ एप्रिल २०१६ रोजी अभिजीत ताम्हणे यांनी ‘सगुण म्हणू की निर्गुण रे’ हा १०३५ शब्दांचा लेख लिहिला होता, तो वाचण्यासाठी लिंक : https://loksatta.com/aajkalchya-kalakruti-news/traditional-indian-paintings-1221844/

जहांगीरमध्ये पुढल्या पिढय़ा..

खुद्द ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ हीच ६० हून अधिक वर्षांची आहे. त्यामुळे चित्रकारांच्या पुढल्या पिढय़ा जर चित्रकार असतील, तर त्यांचीही प्रदर्शनं ‘जहांगीर’मध्ये भरणं स्वाभाविकच. या आठवडय़ात दिवंगत चित्रकार-कलाचिंतक संभाजी कदम व चित्रकर्ती ज्योत्स्ना कदम यांचे पुत्र- स्वत: ‘जेजे’त अध्यापन करतानाच चित्रकलेविषयी लिहिणारे चित्रकार शार्दूल कदम व त्यांच्या पत्नी राधिका, तसेच नरेंद्र विचारे हे उपयोजित कलेत महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं काम करणारे चित्रकार आणि त्यांची विवाहित कन्या माया यांच्या कलाकृती पाहायला मिळतील. संभाजी कदम आणि नरेंद्र विचारे हे दोघेही ‘जेजे’च्या दोन शाखांत अध्यापनकार्य करीत. दिवंगत माजी कला संचालक बाबुराव सडवेलकर यांचे पुत्र आणि अनेकांना चित्रकलेवर प्रेम करायला शिकवणारे मनस्वी चित्रकार शील सडवेलकर यांचंही प्रदर्शन याच आठवडय़ात ‘जहांगीर’च्या सभागृह दालनात भरणार होतं. पण ते काही कारणानं रद्द झालं आहे. पुढल्या महिन्यात, ५ डिसेंबरला बालचित्रकलेसाठी ‘चित्रे काढा-रंगवा’ हा उपक्रम कैक वर्षे चालविणारे विनायक गोडकर यांचं सिंहावलोकनी प्रदर्शन त्यांचा मुलगा भूपेश भरवतो आहे.

रंगरेषांचं लालित्य हा आजकाल दुर्मीळ होत चाललेला चित्रगुण शार्दूल कदम यांच्या चित्रांत नेहमीच दिसून येतो. मिश्रमाध्यमांत, सहसा खडू, जलरंग किंवा अ‍ॅक्रिलिक वापरून ही चित्रं सिद्ध होतात. अनेकदा पानाफुलांच्या, पक्षी आणि सरिसृपांच्या आकारांमधून मध्येच उमलणारा एखादा चेहरा त्यांच्या याआधीच्या चित्रांतून उमगत असे. ती निबिड स्वप्नदृश्यांसारखी चित्रं आता मागे सरली आहेत. ताज्या प्रदर्शनात शार्दूल यांचा भर पाहिलेल्या- पाहाव्या लागणाऱ्या आणि पाहाव्याशा वाटणाऱ्या वास्तवाधारित आकारांवर दिसेल. गेथायलंड (चिआंग् माइ) येथील वास्तव्यवृत्ती मिळाली असता केलेली काही चित्रं इथं आहेत आणि अन्यही. त्यामुळे काही चित्रांत पौर्वात्य देशांमधली टोपी, झाड, असे संदर्भ दिसतील, पण अस्फुटपणेच. कारण आकार जसा असतो तसा नव्हे, तर शार्दूल यांच्या स्वतच्या चित्रभाषेतच आपल्यासमोर येतो. राधिका कदम यांच्या चित्रांमध्ये निसर्गाधारित आकार दिसू शकतील, पण ही चित्रं अमूर्त आहेत. आकारांचे पोत आणि रंग अगदी तलम-पारदर्शक असल्यामुळे ते तरंगताहेत, उडताहेत असा भास होईल. अमूर्तकलेच्या मुंबई-परंपरेला जे धुमारे फुटले, त्यापैकी एक शाखा आता राधिका कदम जपत आहेत.