News Flash

दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये पळापळ सुरू झाली आहे.

| December 3, 2013 01:59 am

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणी तपास करणारे पुणे पोलीस तसेच राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कशाच्या जोरावर विधान केले, याबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे.
दाभोलकर यांची ऑगस्टमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. या मारेकऱ्यांना अद्याप पकडता आलेले नाही. पुणे पोलीस आणि एटीएस या प्रकरणी तपास करीत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. सीसीटीव्ही फुटेजवरील अस्पष्ट चित्रांमुळे मारेकऱ्यांची रेखाचित्रेही पोलिसांना नीट रेखाटता आलेली नाहीत. त्यामुळे दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तूलमधून गोळी झाडण्यात आली त्या ७.६५ कॅलिबर बनावटीच्या पिस्तुलांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. अशा पद्धतीच्या तब्बल २०० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. एटीएसने मनोज पगावे याला अशा पद्धतीच्या १२ पिस्तुलांसह अटक केली तेव्हा दाभोलकर हत्या प्रकरणाची उकल होईल, अशी चिन्हे दिसू लागली होती. परंतु प्रत्यक्षात काहीच हाती आले नाही. आता पुणे पोलिसांनी त्यात यश मिळविल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस आयुक्त गुलाब पोळ यांनी, कुठलीही नवी माहिती समोर आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दाभोलकर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. मंत्र्यांनी केलेल्या व्यक्तव्यावर काहीही बोलणार नाही. मात्र, या प्रकरणात अद्यापपर्यंत पुणे पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
संजीवकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त (पुणे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:59 am

Web Title: dr dabholkars killers still roaming free
टॅग : Narendra Dabholkar
Next Stories
1 ऊस दर नियामक प्राधिकरणाची ‘धोंड’ अखेर मुख्य सचिवांच्या गळ्यात
2 ठाण्यात खाडीत जमीन विकसित करण्याचा नवा उद्योग
3 येऊरमधील आदिवासी कुटुंबांना जमीन मिळणार
Just Now!
X