आवारातील कर्मचारी वसाहतीच्या पाडकामास सुरुवात; राज्य सरकारच्या दिरंगाईचा ऐतिहासिक वास्तूला फटका
देशाला अणू विज्ञानाची दिशा देणारे डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल परिसरातील ‘मेहरानगीर’ या बंगल्यावर अखेर हातोडा पडणार आहे. देशभरातील शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. होमी भाभा यांची ही वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, हा बंगला खरेदी करणाऱ्या गोदरेज कंपनीच्यावतीने बंगल्याच्या परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीचे पाडकाम आठवडाभरापूर्वी सुरू झाले असून लवकरच बंगल्याची वास्तूही पाडली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
डॉ. भाभा यांच्या वडिलांचा दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील मेहरानगीर या बंगल्यात डॉ. भाभा यांचे वास्तव्य नसले तरी देशाच्या अणू संशोधन कार्यक्रमाची आखणी याच निवासस्थानी करण्यात आल्याच्या नोंदी आहेत. डॉ. भाभा यांचे या बंगल्यात वास्तव्य नसले तरी हा बंगला त्यांची कर्मभूमी आहे. यामुळे या बंगल्याचे जतन व्हावे आणि त्याला पुरातन वास्तूचा दर्जा द्यावा अशी मागणी भाभा अणू संशोधन केंद्रातील कर्मचारी आणि अणूउर्जा विभागाच्या नॅशनल फोरम फॉर एडेड इंस्टिटय़ूशन एम्पलॉइज या संस्थेने केली होती. मात्र विविध कलांना स्थान देणाऱ्या ‘एनसीपीए’ या संस्थेने निधी उभारणीसाठी डॉ. भाभा यांच्या मृत्यूपत्राचा दाखला देत मेहरानगीरची विक्री केली. यासाठी झालेल्या लिलावात ही वास्तू गोदरेजने तब्बल ३७२ कोटींना विकत घेतली.
कंपनीने त्याजागी सात मजली इमारत उभी करण्याचा प्रस्तावही पालिकेत सादर केला आहे. यासर्व प्रक्रियेविरोधात कर्मचारी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गेल्याने त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘या वास्तूबाबत राज्य शासनाने विहित वेळेत निर्णय घ्यावा’ असे आदेश दिले होते. परंतु, हा निकाल येऊन काही महिने उलटले तरी राज्य सरकार याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे बंगल्याची मालकी असलेल्या कंपनीने तेथे तोडफोडीचे काम सुरू केल्याचा आरोप कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष आणि टाटा मुलभूत संशोधन संस्थेतील तंत्रज्ञ अधिकारी राम धुरी यांनी केला आहे.
मुंबईत १९१५मध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या बंगल्याची नोंद आढळून आली आहे. यामुळे हा बंगला पुरातन वास्तूच्या निकषांमध्ये बसत असल्याचे धुरी यांचे म्हणणे आहे. डॉ. भाभा यांच्या बंगल्यात त्यांच्या आठवणींचे आणि कामाचे एक संग्रहालय बनवून देशातील तरुणांना विज्ञान क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठीची प्रेरणा द्यावी अशी मुख्य मागणी असल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले. जर राज्य सरकारने याबाबत वेळेवर निर्णय घेतला नाही तर एका विज्ञानमहर्षीच्या आठवणींना आपल्याला मुकावे लागेल असेही धुरी म्हणाले. याचबरोबर एनसीपीएने सादर केलेले मृत्यूपत्रही चुकीचे असून याबाबतही पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचीही शिफारस
ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावी याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संर्पक साधला होता. त्याचा अधार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही १३ मार्च २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.