25 February 2021

News Flash

डॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा

राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाकडे साफ दुर्लक्ष

राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाकडे साफ दुर्लक्ष

मुंबई : विज्ञान संस्था, एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, शासकीय अध्यापक महाविद्यालय या संस्थांचे मिळून उत्साहाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाकडे राज्य सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. अत्यंत उत्साहाने स्थापन केलेल्या राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाला गेल्या दोन वर्षांत मंजूर केलेला निधी मिळालेला नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास, नव्या योजना रखडल्या आहेत. नवनियुक्त कुलगुरूंच्या निवासाचीही सुविधाही अद्याप विद्यापीठाकडे नाही.

शासनाने २०१९ मध्ये राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियानांतर्गत (रुसा) डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापना केली. विज्ञान संस्था, एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचे मिळून हे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले. ‘रुसा’च्या पहिल्या टप्प्यात या विद्यापीठाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५५ कोटी रुपये ‘रुसा’ने मंजूर केले होते, मात्र प्रत्यक्षात त्यातील एकही पैसाही विद्यापीठाला अद्याप मिळालेला नाही. केंद्राचा आणि राज्याचाही निधी विद्यापीठाला देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यापीठ स्थापन होऊन दोन वर्षे झाली तरीही अद्याप नव्या योजना, अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकलेला नाही.

डॉ. भाभा विद्यापीठ स्थापन करताना रुसामध्ये ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीतील ६० टक्के रक्कम केंद्राने, तर ४० टक्के रक्कम राज्याने देणे अपेक्षित आहे. ‘रुसा’ने विद्यापीठाच्या प्रस्तावात काही त्रुटी दाखवल्या. समूह विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाकडे १५ एकर जमीन असणे आवश्यक आहे. विद्यापीठातील चारही महाविद्यालये जुनी आहेत. त्यांची एकत्रित जमीन मिळूनही १५ एकरची अट पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्राचा निधी आतापर्यंत मिळू शकला नाही. केंद्राचा निधी येत नसल्याचे कारण देत राज्यानेही या विद्यापीठाला अर्थसाहाय्य केले नाही.

‘विद्यापीठाने आता त्रुटींबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईसारख्या ठिकाणी १५ एकर जमिनीच्या अटीची पूर्तता करणे कठीण आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व अडचणी दूर होऊन विद्यापीठाला निधी मिळू शकेल. ‘रुसा’च्या मान्यतेशिवाय निधी देणे योग्य नसल्यामुळे राज्यानेही निधी दिला नाही,’ अशी माहिती विभागातील एका अधिकाऱ्यांनी दिली.

कुलगुरूंच्या निवासाचा प्रश्न

दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच या विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. आतापर्यंत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. नुकतीच डॉ. मोहन लाल कोल्हे यांची नियुक्ती या पदावर झाली आहे. मात्र आता नवे कुलगुरू राहणार कुठे, असा प्रश्न विद्यापीठाच्या प्रशासनाला पडला आहे. चारही महाविद्यालयांकडे त्यांच्या पायाभूत सुविधा आहेत, मात्र त्या महाविद्यालयापुरत्या आहेत. त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या कुलगुरूंसाठी निवासाची सोय विद्यापीठाला करावी लागणार आहे.

विद्यापीठाला चांगला प्रतिसाद

विद्यापीठांवरील महाविद्यालयांचा भार कमी व्हावा, चांगले काम करणाऱ्या महाविद्यालयांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी विद्यापीठांना फक्त स्वायत्तता देण्याऐवजी पुढील टप्पा गाठत समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) ही संकल्पना विकसित झाली. त्यानुसार डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या रूपाने मुंबईत पहिले समूह विद्यापीठ उभे राहिले. समूहातील महाविद्यालयांना एकमेकांच्या सहकार्याने आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:05 am

Web Title: dr homi bhabha state university expecting funds from establishment zws 70
Next Stories
1 गर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार
2 बनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री
3 मेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज
Just Now!
X