मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे  संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेणार आहेत.
मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि साहित्यविषयक अन्य उपक्रमांसाठी संमेलनाध्यक्षाला त्यांच्या कार्यकाळात राज्यभर फिरण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून हा एक लाख रुपयांचा निधी मिळतो. या रकमेच्या विनियोगाविषयी आणि संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपक्रमाविषयी कोतापल्ले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हा विषय माझ्यादृष्टीने महत्वाचा आहे असे मला वाटते. महाराष्ट्राच्या विविध भागातील काही निवडक सार्वजनिक ग्रंथालयांना येत्या वर्षभरात भेट देण्याचा माझा विचार आहे. या भेटीतून साहित्यप्रेमी आणि चोखंदळ वाचक नेमके काय वाचतात, कोणती पुस्तके अधिक वाचली जातात, कोणते लेखक अधिक लोकप्रिय आहेत, त्याची काही विशेष कारणे आहेत का, हे शोधण्याचा आपला विचार आहे. यातून मराठी वाचकांची अभिरुची कळण्यास नक्कीच मदत होणार आहे.
सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. संगणकाने खूप मोठी क्रांती घडविली आहे. मात्र आपल्याकडे अद्यापही संगणकावर म्हणावा तितका मराठीचा वापर होत नाही किंवा केला जात नाही. संगणकावर मराठीचा  जास्तीत जास्त वापर व्हावा, तो वाढावा, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कोतापल्ले म्हणाले.
एक लाखाची रक्कम यापूर्वी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. द. भि. कुलकर्णी, उत्तम कांबळे आणि वसंत आबाजी डहाके यांना मिळाली होती. पुणे साहित्य संमेलनाचा खर्च वजा जाता परिषदेकडे ८२ लाख रुपयांची शिल्लक उरली होती. या रकमेच्या व्याजातून संमेलनाध्यक्षाला हे एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दरवर्षी साहित्य संमेलनात एक लाख रुपयांचा धनादेश संमेलनाध्यक्षांकडे देण्यात येतो.