डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्टरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने 2 हजार पानी आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान, या तिन्ही डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणीही 25 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पायल तडवी या २३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात वरिष्ठ असलेल्या डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. भक्ति मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. पायल हिने या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून म्हणजे वर्षभरापासून या तिघींनी त्यांचा छळ सुरू केला होता. या तिघींकडून होणारा जाच पायलने अनेकदा पालकांना, पतीला सांगितला होता. त्याविरोधात रुग्णालयाचे अधिष्ठाते, वसतिगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्यात्यांकडे लेखी तसेच तोंडी तक्रारीही केल्या होत्या. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती यापूर्वी पोलिसांकडून देण्यात आली होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

यापूर्वी या प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टरांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्या तिघींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 25 जुलै पर्यंत तहकुब करण्यात आली आहे.