पहिला ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान

‘मानवी जीवन परिपूर्ण होण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला यांनी एकमेकांचा हात धरून सतत चालत रहायला हवे. चंद्रावर रॉकेट पाठवणारा शास्त्रज्ञ जितका महत्त्वाचा आहे तेवढाच चंद्रावर काव्य लिहिणारा कवीही महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे मत ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.

डॉ. अत्रे यांना पहिला ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘प्रत्येक मैफलीनंतर मिळणारा आनंद हा पुरस्कारच असतो. मात्र, त्याचबरोबर ‘लोकसत्ता’सारख्या प्रतिष्ठित माध्यमाकडून योगदानाची दखल घेतली जाते तेव्हा निश्चितच बळ मिळते,’ अशाही भावना डॉ. अत्रे यांनी व्यक्त केल्या.

कला साहित्याच्या संगमातून स्त्रिची, तिच्या संघर्षांची, तिच्यातील शक्तीची रुपे सोमवारी ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कारातून उलगडली. यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कार्यकर्तीना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना अत्रे म्हणाल्या, ‘अनेक कार्यक्षेत्रांचे पर्याय आता उपलब्ध आहेत. मात्र कलेचा प्रांत वेगळा आहे.  सर्वाना जोडणारा, या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे एकमेकाला नाते सांगणारा, या विश्वातील जे मंगल, शाश्वत आहे त्याची जाणीव करून देणारा आहे. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर जीवन कसे जगावे हे कलाच माणसाला शिकवते.’

समाजसेविका प्रिती पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे, केसरी टूर्सचे केसरी पाटील, लोकसत्ताचे तरूणकुमार तिवारी यांच्या उपस्थितीत पॅराप्लेजिक रूग्णांसाठी काम करणाऱ्या डॉ. सुलभा वर्दे, आदिवासी स्त्रीयांसाठी काम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन, स्त्री सन्मानासाठी काम करणाऱ्या रुबीना पटेल यांना पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, एनकेजीएसबी बॅंकेचे चिंतामणी नाडकर्णी, ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर आणि लोकसत्ताचे केदार वाळिंबे यांच्या उपस्थितीत मनोरूग्ण स्त्रीयांसाठी काम करणाऱ्या सुचेता धामणे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि समाजसेविका शीतल आमटे-करजगी यांना पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर,  व्ही. एन. मुसळुणकर ज्वेलर्सच्या भक्ती मुसळुणकर, लोकसत्ताच्या कार्यकारी प्रकाशक वैदेही ठकार यांच्या उपस्थितीत माहिलांसाठी रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उद्योजिका मनिषा धात्रक, नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या परिणीता दांडेकर यांना पुरस्कार देण्यात आला.

सोनाली कर्णिक, श्रुती भावे, गिरीजा मराठे, कविता राम, अद्वैता लोणकर, मिताली विंचुरकर यांच्या सुरेल गायन, वादनाने कार्यक्रमाची उत्साहात सुरूवात झाली. अभिनेत्री हेमांगी कवी यांनी सादर केलेल्या नाटय़प्रवेशातून, अभिनेत्री मधुरा वेलणरकर, पूर्वी भावे यांच्या काव्य वाचनातून स्त्री भावनांचे  पदर उलगडले. पंडित अनुराधा पाल यांच्या तबलावादनाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.

लोकसत्ताचे  संपादक गिरीश कुबेर यांनी जीवनगौरव पुरस्कारामागील भूमिका उलगडली. ‘अनेक क्षेत्रात महिला मोठे काम करत आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या पुरस्कारातून व्यक्त करण्याचा आमचा मानस आहे. आमची पिढी ही डॉ. प्रभा अत्रे यांच्याबद्दल कायमच कृतज्ञ राहील. प्रभाताईच्या गायनाने आणि बंदिशींनी आमची पिढी घडवली,’ असे कुबेर म्हणाले.

लोकसत्ताच्या ‘फीचर्स एम्डिटर’ आरती कदम यांनी नवदुर्गाचा शोध घेणाऱ्या लोकसत्ताच्या उपक्रमामागीत भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ‘या पुरस्काराला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही चारशे प्रवेशिका आल्या होत्या. प्रत्येकीच्या कामाचा आवाका कमी-जास्त असला तरीही प्रत्येकीचे काम महत्वाचे आहे. अर्ज करणारी प्रत्येकजण प्रकाश देणारी पणती आहे.’ उत्तरोत्तर रंगत गेलेल्या आणि उपस्थित प्रत्येकाला स्त्रीच्या शक्तीची, तिच्या कतृत्वाची जाणिव करून देणाऱ्या, आनंदाची शिदोरी पदरी घालणाऱ्या या कार्यक्रमाचे संहिता लेखन  चिन्मय पाटणकर यांनी केले होते तर सूत्रसंचालन अभिनेते तुषार दळवी यांनी केले. पुरस्कार्थींच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या ध्वनीचित्रफीतींसाठीचा आवाज होता मकरंद पाटील यांचा.

पॅराप्लेजिक रूग्णांसाठी काम करणाऱ्या डॉ. सुलभा वर्दे, आदिवासी स्त्रीयांसाठी काम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन, स्त्री सन्मानासाठी काम करणाऱ्या रुबीना पटेल, मनोरूग्ण स्त्रीयांसाठी काम करणाऱ्या सुचेता धामणे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. स्वर्णलता भिशीकर, समाजसेविका शीतल आमटे-करजगी, माहिलांसाठी रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उद्योजिका मनिषा धात्रक, नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या परिणीता दांडेकर यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील आणि सुनिता पाटील,  ‘ एनकेजीएसबी’ बँकेचे चिंतामणी नाडकर्णी, व्ही. एन मुसळुणकर ज्वेलर्सचे सुहास मुसळुणकर आणि भक्ती मुसळुणकर, अभिनेत्री इला भाटे, मृणाल कुलकर्णी  आदी मान्यवर उपस्थित होते.