‘लोकसत्ता गप्पां’ मध्ये शब्द-सुरांची मैफल रंगली..

‘चित्रपट संगीत अजिबात वाईट नाही. या संगीताने भारतीय स्वरमेळाची (हार्मनी) निर्मिती केली. चांगल्या गोष्टी ठरवून लोकांना शिकवायला हव्यात. काय आणि कसे ऐकायचे हे श्रोत्यांनाही कळले पाहिजे. आपल्या परंपराही तपासून घ्यायला हव्यात,’ असे विचार ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी रविवारी व्यक्त केले. त्याचवेळी ‘आपण आपलेच संगीत ऐकत नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात डॉ. अत्रे यांच्या स्वरांइतकाच शुद्ध, स्पष्ट विचार आणि वाणीतून संगीताचा रससिद्धांत उलगडला. त्याला प्रभाताईंच्या शिष्या चेतना बानावत यांच्या मधूर स्वराची जोड मिळाली. त्यांना तबल्याची साथ केली संदीप पवार यांनी. प्रभाताईंच्याच वैशिष्टय़पूर्ण रचनांनी मैफल रंगत गेली. ‘कलाकार आणि श्रोते एकाच स्तरावर येऊ लागतात, तेव्हा निर्मितीचा स्तरही उंचावतो,’ या प्रभाताईंच्याच विचाराची झलक श्रोत्यांना या स्वर-गप्पांमध्ये आढळली. लहानपणी सर्व स्पर्धामध्ये उत्साहाने सहभागी होताना गाण्याशी झालेली ओळख.. शेकडो शिष्यांना घडवणाऱ्या गुरू, सामान्यांपर्यंत संगीत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या लेखिका, कवयित्री.. असा स्वरयोगिनी डॉ. अत्रे यांचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला. कालानुरूप संगीतात होत गेलेल्या बदलांचे सप्रमाण विवेचन प्रभाताईंनी केले. लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

कालानुरूप शास्त्रीय संगीताचा बदलेला आकृतीबंध मांडताना प्रभाताई म्हणाल्या, ‘‘नियमांच्या चौकटीत राहून बेगळे काही करणे आव्हानात्मक असते. आहे त्यात नाविन्य साधता आले पाहिजे. नवा आकृतीबंध गरजेचा असतो, तसा त्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनही गरजेचा आहे. कलेतही ज्याची गरज असते तेच टिकून राहते. राग विकसित होण्याच्या टप्प्यांमध्ये संगीतात अनेक बदल झाले. कलाकाराला संगीताचे व्याकरण माहिती हवे, शास्त्र आलेच पाहिजे. मात्र मला शास्त्र कळते हे दाखवण्यासाठी गाऊ नये. श्रोत्यांना आनंद देण्यासाठी मैफल सजली पाहिजे.’’

केसरी टूर्स या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. केसरी टूर्सचे केसरी पाटील, सुनिता पाटील, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, प्रकाशक वैदेही ठकार, संगीत, नाटय़, साहित्य क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. हंसध्वनी, किरवाणी या कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीताला मिळालेल्या रागातील प्रभाताईंच्या रचना, चैती, संगीताच्या परंपरागत मांडणीतील चतुरंग या संगीत प्रकारांची झलक असा स्वरयोग जुळून आला होता. ‘जगत जननी भवतारिणी, मोहिनी तू नवदुर्गा..’ या भैरवीचे सूर कानात साठवत आणि त्यातील मांगल्याचे मूर्त रूप असलेल्या प्रभाताईंचे शब्द मनात घोळवत या मैफलीची सांगता झाली.