विलेपार्ले पूर्व येथील पार्ले कट्टय़ाने पन्नास कार्यक्रमांचा पल्ला गाठला असून यानिमित्त, राजस्थानमध्ये जलक्रांती घडवणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे यांचे व्याख्यान होत आहे. मॅगसेसे व स्टॉकहोम वॉटर प्राईजसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असणारे राजेंद्र सिंह पाणी प्रश्न एक बिकट समस्या या सर्वाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर यावेळी मार्गदर्शन करतील. यानिमित्ताने डॉ. राजेंद्र सिंह यांचे कार्यकर्तृत्व जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे अविनाश कुबल हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. संपर्क- रत्नप्रभा महाजन ९९३०४४८०८०.
’रविवार, १३ डिसेंबर, संध्याकाळी ५.३० वाजता
’साठे उद्यान, मालवीय पार्क रस्ता/चौक, शिवसेना शाखेसमोर, विलेपार्ले पूर्व.

‘प्रात:स्वर’मध्ये व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम
सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून वडिलांकडे कर्नाटक संगीत आणि व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेतले. डॉ. राजम यांनी व्हायोनिलवादनाच्या अनेक कार्यक्रमांच्या सादरीकरणाबरोबरच अनेक विद्यार्थीही घडविले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री असे प्रतिष्ठेचे नागरी सन्मान मिळालेल्या डॉ. एन. राजम यंदाच्या ‘प्रात:स्वर’ या सकाळच्या मैफलीत व्हायोलिनवादन करणार आहेत. पंचम निषाद संस्थेचा हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
’रविवार, १३ डिसेंबर सकाळी ६.३० वाजता.
’पु. ल. देशपांडे कला प्रांगण, रवींद्र नाटय़मंदिर संकुल, प्रभादेवी.

‘सिनेकॉले’
सिनकॉले माध्यमातून साकार होणारे हे जगातील पहिलेच प्रदर्शन आहे. तांदळापासून बनविलेल्या कागदावर अनेक थर देऊन तयार केलेल्या अविजीत रॉय यांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळत असून कांस्य धातूपासून बनविलेल्या शिल्पकृतीही या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
’ जहांगीर कला दालन १४ डिसेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७.

संवाद व्याख्यानमाला
व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कलावंत, विशिष्ट विषयांचे अभ्यासक, शास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रांतील दिग्गजांचे विचार पोहोचवून लोकांना बहुश्रूत केले जाते. संदेश प्रतिष्ठानतर्फे संवाद व्याख्यानमाला सुरू झाली आहे. शनिवारी आहारतज्ज्ञ डॉ. वैदेही नवाथे, रविवारी परराष्ट्रव्यवहार तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सोमवारी अभिनेता सुनील बर्वे तर मंगळवारी ‘व्हॉईस ऑफ रफी’ श्रीकांत नारायण असे नामवंत या व्याख्यानमालेद्वारे रसिकश्रोत्यांना भेटणार आहेत. अनिल जोशी यांच्या संकल्पनेतून रूपरेषा साकारली आहे.
’आजी-आजोबा उद्यान, अशोकवन, दहिसर पूर्व
’१५ डिसेंबपर्यंत दररोज सायंकाळी ७.३०

‘ईसेन्स ऑफ दी वॉटर कलर’
भावेश झाला हे कलावंत प्रामुख्याने जलरंगांतील चित्रकृतींवर भर देतात. ‘ईसेन्स ऑफ वॉटर कलर’ या प्रदर्शनात त्यांनी लाकडापासून तयार केलेल्या रचनांचे जलरंगातील आविष्कार सादर करण्यावर विशेष भर दिला आहे. लाकडाचा रंग, पोत, गंध आपल्याला मोहून टाकतो असे भावेश झाला यांचे मत आहे. लाकडाचा सबंध प्रकाशाशी येतो तेव्हा अद्भुत असे भासते, असे त्यांचे मत आहे. अर्थात लाकडाच्या रचनांव्यतिरिक्त पावसाळी रात्री रस्त्यावर दिसणारे दृश्य, बंदरात विसावलेल्या लाकडाचा बहुतांशी वापर असलेल्या बोटी अशी चित्रेही पाहायला मिळतील.
– नेहरू सेंटर कला दालन, वरळी.
– १५ ते २१ डिसेंबर दरम्यान  सकाळी ११ ते सायंकाळी ७.

‘सिल्व्हर मॅजिक’
हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ म्हटला की मुख्यत्वे हिंदी सिनेमातली अजरामर गाणी चटकन ओठांवर येतात. हिंदी चित्रपटसृष्टीचे त्या काळचे सुपरस्टार दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांच्याबरोबरच शम्मी कपूर व तत्सम अनेक हिंदी सिनेमांतील कलावंतांचे संगीतमय चित्रपट असलेला हा सुवर्णकाळ. स्टुडिओमध्ये मुख्यत्वे चित्रपट तयार केले जात. गाण्यांसह बहुतांशी चित्रीकरण स्टुडिओमध्ये केले जात असे. तेव्हा सिनेमाची लोकप्रियता वाढावी, प्रसिद्धी व्हावी या दृष्टीने त्या त्या सिनेमांतील प्रमुख कलावंत जोडीची छायाचित्रे विशिष्ट पद्धतीने काढणारे जेठालाल एच. ठक्कर हे छायाचित्रकार आपल्या इंडिया फोटो स्टुडिओ या स्वत:च्या स्टुडिओतर्फे छायाचित्रे काढत. हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात असंख्य कलावंतांची त्या त्या सिनेमाच्या प्रसिद्धीच्या वेळी त्यांनी काढलेली छायाचित्रे हा आजघडीला अमूल्य असा ठेवा आहे. हा अमूल्य ठेवा प्रथमच ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील पट उलगडला जाणार आहे. ऐतिहासिक मूल्य असलेले हे छायाचित्र प्रदर्शन १३ डिसेंबरपासून सुरू होत असून १२ जानेवारीपर्यंत म्हणजे तब्बल एक महिना रसिकांना पाहायला मिळणार आहे.
आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या हस्ते केले जाणार आहे.
’भाऊ दाजी लाड संग्रहालय, राणीचा बाग, जिजामाता उद्यान, भायखळा.
’१४ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७