मुंबई : राज्यातील नेमकी करोनास्थिती काय, या विषाणूची दुसरी लाट आली आहे का, लस दृष्टिपथात आहे का, अशा अनेक शंकांचे निरसन आज ‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमात होईल. राज्याच्या करोना विशेष कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक हे सायंकाळी ६ वाजता करोनाची सद्य:स्थिती आणि उपाययोजनांवर भाष्य करतील.

राज्यात करोनाने शिरकाव केला तेव्हा त्याचे निदान, उपचार, विलगीकरण याबाबत अनभिज्ञ असलेले प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये राज्य विशेष कृतिदल स्थापन केला. त्याची धुरा डॉ. संजय ओक यांच्याकडे सोपविण्यात आली. मुंबईतील वाढता मृत्युदर आटोक्यात आणण्यात, धारावी, मालेगाव येथील संसर्ग नियंत्रणात आणण्यात या दलाची महत्त्वाची भूमिका आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना मार्गदर्शन करण्यापासून ते वेळेत निदान करण्यासाठी उपाययोजना, विलगीकरण, अलगीकरणाच्या नियमावलीत आवश्यकतेनुसार बदल, औषधांचा वापर यावर सातत्याने बारीक लक्ष ठेवून या कृतिदलाने ठोस पावले उचलली. या दलाचे प्रमुख म्हणून डॉ. ओक यांनी करोना साथीचा हा प्रवास वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला आहे. त्यांनाही करोनाने गाठले होते; परंतु करोनामुक्त होऊन त्यांनी पुन्हा कृतिदलाची सूत्रे हातात घेतली आहेत. करोनाविरोधी लढाईतील त्यांचा अनुभव वेबसंवादातून ऐकता येईल.

उपाययोजना समजून घ्या..

’तुटपुंजे मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि सुविधांची वानवा आदींनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ग्रासली आहे.

’अशा स्थितीत ग्रामीण भागांत करोना रुग्णांवर उपचार करणे आणि संसर्ग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक आहे.

’यादृष्टीने कृतिदलाने काय उपाययोजना केल्या आहेत, याचा उलगडाही या वेबसंवादातून होईल.

’रक्तद्रव उपचारासह विविध औषधे, थेरपी यांची परिणामकारकता, उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना होणारा त्रास, त्यावरील उपाययोजना याची शास्त्रीय माहिती वेबसंवादात समजून घेता येईल.

सहभागासाठी : http://tiny.cc/LS_Vishleshan_28Sept  येथे नोंदणी आवश्यक.