मुंबई :  गेले सात महिने राज्यात थैमान घालत असलेल्या करोना साथीचा प्रवास, सद्य:स्थिती आणि उपाययोजना याचा आढावा करोना विशेष कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक घेणार आहेत. ‘लोकसत्ता विश्लेषण’च्या उपक्रमात सोमवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ओक यांच्याशी संवाद साधता येईल.

राज्यात करोना विषाणूने प्रवेश केला तेव्हा याचे निदान, उपचार, विलगीकरण याबाबत अनभिज्ञ असलेले प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य विशेष कृतिदल एप्रिलमध्ये स्थापन केला. याची धुरा मुंबई पालिका प्रमुख रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक यांच्याकडे सोपविण्यात आली. मुंबईचा वाढता मृत्युदर आटोक्यात आणण्यात, धारावी, मालेगाव येथील संसर्ग नियंत्रणात आणण्यात या दलाची महत्त्वाची भूमिका आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना उपचाराबाबतच्या अडचणी सोडवीत मार्गदर्शन करण्यापासून ते वेळेत निदान करण्यासाठी उपाययोजना, विलगीकरण, अलगीकरणाच्या नियमावलीत आवश्यकतेनुसार बदल, औषधांचा वापर यावर सातत्याने बारीक लक्ष ठेवून ठोस पावले दलाने उचलली. दलाचे प्रमुख म्हणून डॉ. ओक यांनी करोना साथीचा हा प्रवास  वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला आहे. त्यांचा हा अनुभव वेबसंवादातून ऐकता येईल. त्यांनाही करोनाने गाठले होते; परंतु  करोनावर मात केल्यावर पुन्हा त्यांनी दलाची सूत्रे हातात घेतली आहेत.

उपाययोजनांची माहिती..

तुटपुंजे मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा अशी असक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असलेल्या ग्रामीण भागात करोना रुग्णांना उपचार देणे आणि संसर्ग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक आहे. या दृष्टीने दलाने काय उपाययोजना केल्या आहेत याचा उलगडाही या वेबसंवादातून होणार आहे. रक्तद्रव उपचारासह विविध औषधे, थेरपी यांची परिणामकता, उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना होणारा त्रास, यावरील उपाययोजना याची शास्त्रीय माहिती वेबसंवादात समजून घेता येईल.

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक http://tiny.cc/LS_Vishleshan_28Sept