आठवडय़ाची मुलाखत : डॉ. शशिकांत म्हशळ (नाक-कान-घसा तज्ज्ञ)

रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो. रात्रीची झोप पूर्ण होत नाही हे जरी लक्षात येत असले तरी झोपेदरम्यान वारंवार अडथळा येण्याचे कारण शोधण्यासाठी ‘स्लीप अ‍ॅप्निया’ तपासणी उपयुक्त ठरू शकते. ‘स्लीप अ‍ॅप्निया’ हा केवळ एक आजार नाही तर अनेक आजारांचे मूळ या आजारात दडले आहे. या पाश्र्वभूमीवरच, मुंबई पालिकेच्या कूपर रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ‘स्लीप टेस्ट’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे प्रमुख कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. शशीकांत म्हशळ यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

’ ‘स्लीप अ‍ॅप्निया’ म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींना ७ ते ८ तास आणि लहान मुलांना ९ ते १० तास झोपेची गरज असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. परंतु, अनेक रुग्णांना झोपेदरम्यान श्वासोच्छ्वास करण्यास विविध कारणांनी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या अडथळ्याला ‘स्लीप अ‍ॅप्निया’ किंवा निद्राविकार म्हणतात. ‘अ‍ॅप्निया’ म्हणजेच काही वेळ श्वास थांबणे. निद्रानाश हा आजार मानसिक आजाराशी संबंधित असून याचा आणि ‘स्लीप अ‍ॅप्निया’चा संबंध येत नाही. ‘स्लीप अ‍ॅप्निया’ झोपेदरम्यानच्या श्वसनक्रियेतील अडथळय़ासंदर्भातील आजार आहे. श्वसनास अडथळा होण्यासोबतच झोपेत श्वसनाचा वेग मंदावणे, हेदेखील या आजाराचे एक लक्षण आहे.

’ यामागे काय कारणे असू शकतात?

‘स्लीप अ‍ॅप्निया’चे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे शरीरांतर्गत चरबीचा एक थर जमा होतो. त्यामुळे अवयवांना काम करताना अतिरिक्त ताण सोसावा लागतो. अनेकदा घसा किंवा मानेभोवती चरबीचा थर जमा होतो. त्यामुळे श्वसनक्रियेत अडथळा होत असतो. श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो तेव्हा शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अशा वेळी मेंदू सतर्क होतो व झोपेच्या अधीन झालेली व्यक्ती जागी होते. याव्यतिरिक्त पडजीभ किंवा जीभ जाड असणे, नाकाचे हाड वाढणे, सातत्याने थंड पदार्थ खाल्ल्यामुळे टॉन्सिल वाढणे यामुळे घोरण्याचे प्रमाण वाढून श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो. मद्यपान आणि धूम्रपान यामुळेही श्वसनगती मंदावते.

’ ‘स्लीप अ‍ॅप्निया’ची लक्षणे काय आहेत?

हा आजार केवळ लठ्ठ व घोरणाऱ्या व्यक्तींमध्येच असतो असे नाही. रात्रीची झोप पूर्ण न होणे, सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणे, दिवसभर झोप येत राहणे, एकाग्रता नसणे, कामान मन न लागणे ही लक्षणे ‘स्लीप अ‍ॅप्निया’मध्ये पाहावयास मिळतात. या आजारात रुग्णाला दिवसभर झोप येत राहते आणि ही झोप आवरणेही अवघड होते. त्यामुळे जिथे शक्य होईल तेथे रुग्ण झोपतो. तसे पाहता सर्वसाधारण व्यक्तीलाही अनेकदा झोपेदरम्यान जाग येत असते. मात्र रात्रभरात १५ ते २० पेक्षा अधिक वेळा जाग येत असेल तर मात्र वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

’ कूपर रुग्णालयात या आजारावर कशा प्रकारचे उपचार दिले जातात?

२२ मार्चपासून कूपर रुग्णालयात ‘स्लीप टेस्ट’ विभाग सुरू झाला आहे. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस ही तपासणी करता येते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बाह्यरुग्ण विभागासाठी असताता. बाह्यरुग्ण विभागात रुग्णाची साधारण तपासणी केल्यानंतर त्याला झोपेच्या तपासणीची आवश्यकता वाटल्यास सायंकाळी सातच्या सुमारास या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णाचे वजन, शरीर द्रव्यमान निर्देशांक (बीएमआय), उंची मोजली जाते. त्यानंतर रुग्णाच्या नाकाला नलिका जोडल्या जातात. छातीला आणि हाताच्या बोटांना पल्सोमीटर जोडले जाते. ही यंत्रे संगणकाला जोडून त्यावरील ‘पॉलिसोमिनोग्राफी’ या सॉफ्टवेअरच्या साह्याने संबंधित रुग्णाच्या झोपेचा अभ्यास केला जातो. साधारण रात्री ९ वाजता ही यंत्रे लावली जातात. रात्रभर झोपेदरम्यान रुग्णाला किती वेळा जाग आली, याची पाहणी केली जाते. २०पेक्षा अधिक वेळा झोपमोड झाली असल्यास त्याची ‘एंडोस्कोपी’ केली जाते. यामध्ये रुग्णाला इंजेक्शन देऊन झोपवले जाते. त्यानंतर नाकातून दुर्बीण टाकून अंतर्गत भागाची तपासणी केली जाते. त्यातून झोपेस अडथळा ठरणारा भाग शोधला जातो व त्या आधारे रुग्णाला वैद्यकीय सल्ला दिला जातो.

’ एका वेळी किती भागाच्या शस्त्रक्रिया करता येतात?

दुर्बिणीतून एंडोस्कोपी केल्यानंतर नेमका अडथळा लक्षात येतो. अनेकदा हा आजार जीभ, पडजीभ, टॉन्सिल, लठ्ठपणा यांच्या एकत्रित समस्येमुळेही होतो. मात्र एका वेळी दोन किंवा तीन भागांवर शस्त्रक्रिया करणे चांगले. गेल्या महिन्यात आम्ही दोन रुग्णांची ‘स्लीप अ‍ॅप्निया’ शस्त्रक्रिया केली. यातील एका ३२ वर्षांच्या रुग्णाचे वजन १०५ किलो होते आणि लठ्ठपणामुळे त्याच्या घशाजवळ चरबी जमा झाली होती. शिवाय नाकाचे वाढलेले हाड, टॉन्सिल आणि पडजीभेचाही त्रास होता. तो रिक्षाचालक रिक्षा चालवतानाही झोपायचा. यात तो अनेकदा अपघातातूनही बचावला होता. मात्र हा त्रास वाढत असल्याने त्याने आमच्याशी संपर्क साधला. प्रथम त्याला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने वजन ९० किलोपर्यंत आणल्यानंतर त्याच्या नाकाचे हाड, पडजिभेचा आकार शस्त्रक्रिया करून कमी करण्यात आला. सध्या तो रुग्ण स्थिर आहे आणि त्याला रात्रीची शांत झोप लागते.

’ शस्त्रक्रियेशिवाय काय उपाय आहे?

अशा रुग्णांना ‘सी-पॅप’ हे यंत्र दिले जाते. सध्या पालिका रुग्णालयात ही सोय नसली तरी, खासगी रुग्णालयात ते उपलब्ध आहे. रात्री झोपताना हे यंत्र नाकाला लावून झोपायचे असते. या यंत्रातून ऑक्सीजन पुरवला जातो. त्यामुळे नैसर्गिक श्वसनक्रियेत ऑक्सिजनपुरवठा कमी झाला तरी या यंत्राच्या मदतीने ऑक्सिजन पुरवला जातो.

’ शस्त्रक्रियेनंतर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो का?

हो बऱ्याचदा एकदा शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाने वजन नियंत्रणात ठेवले नाही तर हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो. यासाठी ‘स्लीप अ‍ॅप्निया’ झाल्यानंतर रुग्णाने सजगतेने आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

’ या आजारावरील उपचाराचा खर्च किती?

कूपर रुग्णालयात तर अगदी १० रुपयाच्या केस पेपरवरही रुग्णाची तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाते. मात्र खासगी रुग्णालयात यासाठी जास्त पैसे आकारले जातात.

मुलाखत – मीनल गांगुर्डे