डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
सुमेध वडावाला रिसबूड यांच्या ‘सफाई’ या कादंबरीत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आहे. गांधी आणि आंबेडकर वादाचा (विचारांचा) समन्वय या कादंबरीत दिसून येतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मुंबईत केले.
हिताय फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास प्रसिद्ध छायाचित्रकार सुधाकर ओळवे, महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कामगार सुनील यादव, हिताय फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
‘सफाई’ कादंबरीत शुद्ध मार्क्‍सवाद, स्त्रीवाद यांचीही सूत्रे सापडतात असे सांगून सबनीस म्हणाले, कादंबरीतून सफाई, मेहतर, भंगी समाजाच्या अत्यंत भेदक वास्तवाचे दर्शन घडते. एका विशिष्ट समाजानेच आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णानी या पुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले.
सुनील यादव यांनी सांगितले, माझ्या घरातील आणि समाजातील प्रत्येक बारीकसारीक तपशील मला या कादंबरीत वाचायला मिळाले तर ओळवे म्हणाले, गलिच्छ कामामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वत:लाच बोथट व्हावे लागते. दारू प्यायल्याशिवाय तो कामच करू शकत नाही. विशेष म्हणजे या एकाच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून शंभर टक्के आरक्षण आहे.