बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री, लेखिका, संपादक आणि वैद्यक पदवीधर डॉ. सुशीलाराणी पटेल यांचे गुरुवारी दुपारी मुंबईत वांद्रे येथे निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. भारतातील पहिल्या चित्रपट मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. सुशीलाराणी या जयपुर-अत्रौली घराण्याच्या गायिका होत्या. या घराण्याचे जनक अल्लादिया खॉंसाहेब यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले होते.
पती बाबूराव पटेल यांच्यानंतर ‘फिल्म इंडिया’ मासिकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘आकाशवाणी’च्या त्या मान्यताप्राप्त गायिका आणि व्हायोलिनवादकही होत्या. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनी ‘द्रौपदी’ आणि ‘गवळण’ या चित्रपटातूनही अभिनय केला होता. त्यानंतर मात्र सुशीलाराणी यांनी केवळ गाण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले. मोगुबाई कुर्डीकर, सुंदराबाई जाधव यांच्याकडेही त्यांनी शास्त्रीय संगीताची साधना केली.
संगीत नाटक अकादमी आणि महाराष्ट्र राज्य सांगीतिक गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारतातील सर्वात जुन्या गायिका तसेच होमिओपॅथी डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख होती. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी कायद्याची पदवीही मिळविली होती. म्युझिक अ‍ॅडव्हायझरी बोर्ड, सेन्सॉर मंडळ यावरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले होते. शास्त्रीय संगीताचे जतन आणि नव्या पिढीला याचे शिक्षण देण्यासाठी या दाम्पत्याने ‘शिव संगीतांजली’ या संस्थेची स्थापना केली होती. हंसराज बहल यांनी संगीतबद्ध केलेले ‘गवळण’ चित्रपटातील ‘लगत नजर तोरी छैलिया’ हे द्वंद्वगीत मुकेशसह डॉ. सुशीलाराणी यांनीच गायले होते. त्या अलीकडच्या काही महिन्यांपर्यंत विविध समारंभ आणि कार्यक्रमांना उपस्थित राहात होत्या. पाच महिन्यांपूर्वी मुंबईत अभिनेता आमिर खान, अनिल कपूर यांच्या हस्ते बीरेन कोठारी लिखित ‘सागर मुव्हिटोन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या कार्यक्रमासही त्या उपस्थित होत्या.   सुशीलाराणी पटेल यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२.०० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी वांद्रे येथील ‘गिरनार’ या निवासस्थांनी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

वयाच्या ९३ व्या वर्षी रंगविली मैफल..
‘स्वरआलाप’ संस्थेतर्फे मुंबईत माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात ९३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. सुशीलाराणी यांचा खास सत्कार करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे सत्कार सोहळ्यात डॉ. सुशीलाराणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याच; पण गायनाची मैफलही रंगविली होती.   

..आणि बेबी मुमताजची ‘मधुबाला’ झाली
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दाम्पत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे ‘मधुबाला’असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.