निवासी डॉक्टरांनी संप करून डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सहसंचालक म्हणून केलेली ‘पदोन्नती बदली’ आपण स्वीकारू शकत नसल्याचे डॉ. लहाने यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला कळविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लहाने यांनी ही हंगामी पदोन्नती नाकारल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाते डॉ. चंदनवाले यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते. डॉ. श्रीमती डोणगावकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे हंगामी सहसंचालकाच्या पदोन्नतीचा प्रश्न निर्माण झाल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे म्हणणे आहे. लहाने यांच्या विरोधात आकसाने कारवाई करण्याचा यात प्रश्न येत नसून सेवाज्येष्ठतेनुसार हंगामी पदोन्नतीसाठी शिफारस होऊ शकते हे लक्षात घेऊनच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. तथापि ही हंगामी पदोन्नती नाकरण्याचा नियमानुसार त्यांना पूर्ण अधिकार असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. लहाने हे सध्या हंगामी सहसंचालक म्हणून काम पहातच होते. आता त्याबाबतचे आदेश काढून त्यांना जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे. डॉ. लहाने यांनी हंगामी पदोन्नती नाकारण्याचा निर्णय घेतला असून तसे कळविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पाठिंब्यासाठी मोहिमेत भाजप आमदारही
डॉ. लहाने यांना जे.जे.मधून काढले जाऊ नये यासाठी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पुढे आले असून स्वाक्षरी मोहीम काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे. भाजपसह विविध पक्षाच्या आमदारांनी तसेच भाजपच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांनीही डॉ. लहाने यांच्यावरील या कारवाईला विरोध केला असून त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जावी अशी भूमिका मांडली आहे.