डॉ. लहाने व डॉ. पारेख यांना तातडीने हटवण्याची मागणी
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी आज, शुक्रवारपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत सामुहिक रजा आंदोलन सुरू करत आहेत. त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयांसह राज्यभरातील सर्व १४ वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या रुग्णालयांची आपत्कालीन सेवा वगळता इतर कामकाम ढेपाळण्याची शक्यता आहे.
जेजेच्या निवासी डॉक्टरांनी रविवारपासून रजा आंदोलन सुरू केले. त्यानंतर दोन्ही डॉक्टरांच्या कामकाजाच्या चौकशीचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही मार्डने राज्यभरात बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. गेले पाच दिवस जेजे रुग्णालयातील अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या असून बाह्य़रुग्ण कक्षावरही परिणाम झाला आहे. शनिवारी बहुतांश शस्त्रक्रियागार स्वच्छतेसाठी बंद ठेवली जातात. त्यामुळे सोमवारपर्यंत रुग्णालयांच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही. त्याआधीच या आंदोलनावर तोडगा निघावा,’ अशी आशा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली.

तात्यांविरोधातील ‘लहाने’
जेजे रूग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या विरोधात शिकाऊ डॉक्टरांनी छेडलेले आंदोलन म्हणजे एक विनोदच आहे. काहींच्या मते या आंदोलनामागे विनोद आहे. त्याच्या कारणांत जाण्याचे कारण नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्या मंत्रीमंडळातील काही तात्यांना जेजे मधून हलवण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, हे नि/संशय. तात्यांनी आपल्या वागण्याने त्यांना संधी दिली असेलही. परंतु सरकारातील या उच्च पदस्थांनी जेजेमधील वाद मिटवण्याऐवजी तो वाढेल कसा असे प्रयत्न करणे अशोभनीय आहे. सरकारातील काही तात्यांचे राजकीय लागेबांधे काढतात. त्याचीही गरज नाही. याचे कारण समाजात काही करावयाचे असलेले सर्वच जण राजकीय पक्षांशी संबंध ठेउन असतात. तेव्हा तात्यांविरोधकांना चिथावणी देण्यामागे हे कारण नाही. खरा हेतु आहे तो त्या पदावर आपल्या जवळच्याची वर्णी लावण्याचा. तशी ती लावणे हा प्रत्येक सरकारचा अधिकार आहे हे मान्य केले तरी त्यासाठी कार्यक्षम व्यक्तीला असे वागवणे हे योग्य नाही. सरकारातील काहींना तात्या नावडते झाले असले तरी त्यांनी या रूग्णालयास जनताभिमुख केले हे नाकारता येणार नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालून हे उद्योग बंद करावेत. मंत्रीमंडळातील काहींनी इतके लहाने उद्योग करायची गरज नाही.