डॉ. विजया वाड , लेखिका आणि राज्य विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष

चार वर्षांची असताना माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारांनंतर काही महिने घरातच बसून राहावे लागणार होते. एक प्रकारे सक्तीची विश्रांतीच. आता घराबाहेर जाता येणार नाही, खेळता येणार नाही याचे खूप वाईट वाटत होते.  त्या वेळी माझ्या आईने मला अक्षरओळख करून देऊन वाचायला शिकविले. वाचता येऊ लागल्यानंतर लहान मुलांसाठी असलेली गोष्टींची खूप पुस्तके आणून दिली. तेव्हापासून पुस्तके आणि वाचनाशी जी गट्टी जमली ती आजतागायत.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी’ पुस्तकासह भा. रा. भागवत व लहान मुलांसाठी असलेली इतर अनेक पुस्तके, शांता शेळके यांच्या बालकविता वाचल्या. वयाच्या १३/१४ व्या वर्षी वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ना. सी. फडके यांचे संपूर्ण साहित्य वाचून काढले. वाचनाची गोडी लावण्यात आणि मला लिहिते करण्यात माझ्या आईचे महत्त्वाचे योगदान आहे. तिने माझ्यात आत्मविश्वास जागविला. ‘सौंदर्याचा मार्ग हृदयातून सुरू होतो आणि कर्तृत्वाशी येऊन थांबतो’ असे आईने लहानपणी सांगितलेले वाक्य मी आजन्म मनावर कोरून ठेवले आहे.

पुढे ‘आत्मचरित्र’ वाचनाची अधिक गोडी लागली आणि असंख्य आत्मचरित्राचे वाचन केले. दया पवार यांनी लिहिलेले ‘बलुत’ हे वाचलेले पहिले आत्मचरित्र. त्यानंतर ‘अजूनी चालतेची वाट’(आनंदीबाई निजापुरे), ‘स्मृतिचित्रे’ (लक्ष्मीबाई टिळक), ‘स्नेहांकिता’ (स्नेहप्रभा प्रधान), बंध-अनुबंध (कमल पाध्ये), ‘कोणास्तव कुणीतरी’ (यशोदा पाडगावकर), ‘नाच गं घुमा’ (माधवी देसाई), ‘आयदान’ (ऊर्मिला पवार), ‘कोल्हाटय़ाचे पोर’ (किशोर शांताबाई काळे), ‘आमचा बाप आणि आम्ही’ (डॉ. नरेंद्र जाधव) आदी आत्मचरित्रे वाचली. आत्मचरित्र लेखनात पुरुषांपेक्षा महिला अधिक धीटपणाने आपले खासगी आयुष्य उलगडतात असे मला वाटते. या सर्व आत्मचरित्र वाचनाने मला खरे लिहिण्याची, दुसऱ्याच्या जीवनातील निराशा दूर करून त्याच्या जीवनात उत्साह व सकारात्मकता निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. मनाला कधी एकटे वाटले, अस्वस्थ झाले की धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र मी वाचते. या पुस्तकाच्या वाचनाने एकटेपणा आणि अस्वस्थता दूर होते.

हल्लीच्या पिढीत वाचनाची आवड कमी होत चालली आहे. या पिढीतील मुलांमध्ये लहान वयातच वाचनाची गोडी कशी निर्माण होईल याची काळजी आई-वडील आणि शाळेतील शिक्षकांनी घ्यावी. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावेत. मुले पुस्तकांकडे जात नसतील तर पुस्तकांना मुलांपर्यंत घेऊन जावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आई-वडिलांनी लहान मुलांना एखादे गोष्टींचे पुस्तक किंवा त्यातील काही भाग वाचून दाखवावा. यामुळे आपोआपच त्यांना वाचनाची गोडी लागेल आणि पुढे ती सहजपणे वाचन आणि पुस्तकांकडे वळतील. राज्य विश्वकोश मंडळाची अध्यक्ष म्हणून मी जेव्हा काम पाहत होते तेव्हा सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे २० खंड माहितीच्या महाजालात (इंटरनेट) आणले. त्यामुळे १०५ देशातील लाखो वाचकांपर्यंत विश्वकोश पोहोचण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यातील शाळा-शाळांमधून ‘विश्वकोश वाचन स्पर्धा’ आयोजित केल्या. ‘बालकोश’, ‘कुमारकोश’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विश्वकोश, कुमार कोश ‘बोलका’ (ऑडिओ स्वरूपात) केला. त्यामुळे आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणांचा तिरस्कार न करता वाचन संस्कृती वाढविण्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घेता येईल.

ते कटाक्षाने पाहावे. तसेच शालेय वयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळांमधूनच अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज अन्य अवांतर पुस्तके वाचण्यासाठी लावली जावीत आणि परीक्षेत किमान दहा मार्काचा प्रश्न त्या वाचनावर ठेवावा. यातून पुढे ही मुले नक्कीच वाचनाकडे वळतील. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.

माझ्या स्वत:च्या बुकशेल्फमध्ये विविध विषयांवरील सुमारे दोन हजार पुस्तके असून यांत आत्मचरित्रात्मक पुस्तकांची संख्या जास्तआहे. सध्या शिल्पा खेर लिखित ‘यश म्हणजे काय’ हे पुस्तक वाचत आहे. लहानपणी माझ्या आईने मला पुस्तकवाचनाची गोडी लावली. लिहिण्यासाठीही प्रवृत्त केले. वयाच्या २४ व्या वर्षी ‘वजाबाकी’ हे माझे पहिले पुस्तक मेनका प्रकाशच्या पु. वि. बेहेरे यांनी प्रकाशित केले. तेव्हापासून आजवर माझी ११५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हे सर्व श्रेय माझ्या आईचे आहे.

वाचनाची गोडी लागल्यामुळे शब्द हाच माझा श्वास झाला. पुस्तक वाचनाने मला आत्मप्रवृत्त केले. वाचनाने दुसऱ्याला प्रेरणा देणारे व सकारात्मक लेखन करावे अशी शिकवण दिली. वाचनामुळे खरे लिहिण्यासाठी मन टिपकागदाप्रमाणे तयार केले. त्यामुळे पुस्तकांसारखा अन्य कोणीही दुसरा सखा, मित्र नाही..