News Flash

‘समाजाचे पाठबळ संस्थांसाठी महत्त्वाचे’

महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ असून काम करणाऱ्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात डॉ. विकास आमटे उपस्थित जनसमुदायासमोर मनोगत व्यक्त करताना.  (छाया: दिलीप कागडा, संतोष परब)

समाजात विविध संस्था आपल्या परीने वेगवेगळी सामाजिक कामे करीत आहेत. समाजाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बळावरच या सर्व संस्थांना आपले काम करता येते. त्यामुळे समाजाचे पाठबळ या संस्थांसाठी महत्त्वाचे आहे. ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ अशा वेगवेगळ्या संस्थांची माहिती समाजापुढे आणत असून त्यांच्या कामाशी समाजाला जोडून घेण्याचे खूप महत्वाचे काम करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास बाबा आमटे यांनी शुक्रवारी केले.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघु नाटय़गृहात  आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात डॉ. आमटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते यंदाच्या ‘सर्व कार्येषु उपक्रमात’ निवड झालेल्या अकरा संस्थांच्या प्रतिनिधींना ‘लोकसत्ता’च्या वाचकांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. सेवा सहयोग फाऊंडेशन, थिएटर अ‍ॅकॅडमी-महाराष्ट्र मंडळ, शांतीवन, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, अविष्कार, रचना ट्रस्ट, चेतना अपंगमति विकास संस्था, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज, पुणे नगर वाचन मंदिर, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळ या ११ संस्थांचा यामध्ये समावेश होता.

आमटे म्हणाले की, देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विविध प्रकारचे सामाजिक काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ असून काम करणाऱ्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे.

‘सर्व कार्येषु सर्वदा’च्या उपक्रमातून समाजात जनजागृती केली जात असून सर्वसामान्य माणसाला या सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम गौरवास्पद आहे, असेही डॉ. आमटे म्हणाले.

‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक दिनेश गुणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमागील उद्देश सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:55 am

Web Title: dr vikas amte loksatta sarva karyeshu sarvada
Next Stories
1 म्हाडाला ‘झोपु’प्रमाणे स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा देणार!
2 ‘आयफोन टेन’साठी रीघ
3 ऑनलाइन मूल्यांकनाची जबाबदारी आता एकाच कंपनीवर
Just Now!
X