राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये एका विद्यापीठाच्या छत्राखाली आणण्यासाठी विधिमंडळात मंजूर करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा (बाटू) कायदा बदलण्याची नामुष्की टाळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी घाईघाईने या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विलास गायकर यांची निवड केली.
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. १९८९ च्या कायद्यानुसार त्याला एकल विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आधीच्या आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, या विद्यापीठाला सलंग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २७ जून २०१४ मध्ये विधिमंडळात नवा कायदा मंजूर करण्यात आला. मात्र या विद्यापीठाशी सलंग्न व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्याची मुभा अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्याची तरतूद करण्यात आली, म्हणजे सलंग्नतेचा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला. त्यामुळे एका विद्यापीठाच्या छत्राखाली सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये आण्याचा मूळ हेतूही साध्य होऊ शकला नाही. नव्या कायद्यामध्ये पहिल्या कुलगुरुची निवड राज्य शासनाने करण्याची तरतूद करण्यात आली. जो पर्यंत कुलगुरुची निवड होत नाही, तोपर्यंत हा कायदा अस्तित्वात येणार नाही, अशीही त्यात तरतूद करण्यात आली. हा कायदा मंजूर झाल्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यानंतर भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आले. त्यांनी नव्या कुलुगुरुची निवड करण्याऐवजी मार्च २०१५ पासून पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला. परिणामी मंजूर झालेला कायदा अडगळीत पडला आणि जुन्याच कायद्याचा अमल सुरु राहिला. याानुसार कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार देण्याची मुदत फक्त एक वर्षांची निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत कुलुगुरुंची निवड केली नसती तर, २०१४ च्या कायद्यात बदल करावा लागला असता.