“नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी सचिन वाझेवर होती,” असा आरोप करत “त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामातील कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आज केली. आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील नालेसफाईच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली.

नालेसफाईच्या पाहणीनंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “सचिन वाझेला महापालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. तशी माहिती न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- मुंबई महानगरातील खाड्या आक्रसल्या; किनारी क्षेत्रांवर दुष्परिणाम

“मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही. नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा खोटा आहे. नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. ७० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल. शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केला आहे,” असा आरोप शेलार यांनी केला.

हेही वाचा- शिवसेना-काँग्रेसची मुंबईतील प्रभाग फेररचनेची मागणी

“गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा”

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत, जे शिवसेना आणि काँग्रेसला कधीही जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे,” असा आरोप करत शेलार यांनी नालेसफाईच्या गाळाबद्दल सवाल केला होता. “७० कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे. मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल, तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा,” असं आव्हान शेलार यांनी दिलं होतं.