20 November 2019

News Flash

पूर्व उपनगरांत गटारे उघडीच!

पादचारी पडण्याच्या घटनांनंतरही पालिका बेफिकीर

चेंबूर, गोवंडी या परिसरातील गटारांची झाकणे गायब झाली असून, उघडय़ा गटारांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

समीर कर्णुक

गोरेगावमध्ये उघडय़ा गटारात पडल्याने वाहून गेलेला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा शोध सुरू असताना पूर्व उपनगरांत गटार, मॅनहोल याबाबत मुंबई महापालिकेचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ कायम असल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक ठिकाणची गटारे व मॅनहोलवरील झाकणे गायब असून ती कधीही नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात.

गेल्या वर्षी पूर्व उपनगरात उघडय़ा गटारांमध्ये पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्या आधी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा भर पावसात उघडय़ा मॅनहोलमध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाला. गोरेगावच्या घटनेनंतर पुन्हा उघडी गटारे आणि मॅनहोल यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई महानगरपालिका दरवर्षी शहरांतील नाले, गटारे यांच्या साफसफाई, डागडुजीवर करोडो रुपये खर्च करते. मात्र या सर्व कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने अनेकदा ही कामे अगदीच निकृष्ट दर्जाची असतात. त्यामुळे काही महिन्यातच मॅनहोलवर टाकण्यात येणारे झाकणे तुटून जातात. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमध्ये उघडय़ा गटारांमध्ये पडून अनेकजण जीव गमावतात किंवा गंभीररित्या जखमी तरी होतात.

पूर्व उपनगरात गेल्या वर्षी उघडय़ा गटारात पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग आली. त्यानंतर पालिकेने उघडय़ा गटारावर झाकणे लावली. मात्र यावर्षी देखील पूर्व उपनगरातील अनेक भागात गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील कामराज नगर येथील भुयारी मार्ग परिसरात मुख्य रस्त्यावरच अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणे गायब आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती याठिकाणी सर्वाधिक आहे.

अशीच परिस्थिती चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीला लागून आलेल्या मुख्य रस्त्याची आहे. याच परिसरात गेल्या वर्षी दिनेश जाटोलिया (वय २३) या तरुणाचा २३ जूनच्या रात्री उघडय़ा गटारात पडून मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी देखील याठिकाणी अनेक गटारे उघडीच आहेत. तर कुर्ला एसटी डेपोजवळ आलेल्या वत्सलाताई नगर परिसरात देखील अनेक गटारे उघडय़ा अवस्थेत आहेत.

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर देखील अशीच परिस्थिती आहे. या मार्गावर देखील अनेक ठिकाणी गटारांवर झाकणेच नाहीत. एम पूर्व विभागात तर सर्वाधिक उघडी गटारे आहेत. या विभागातील ट्रॉम्बे परिसरात मागच्या वर्षी गटारात पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यासमोरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघडी गटारे आहेत. या परिसरात मोठी लोकवस्ती असल्याने परिसरातील अनेक रहिवाशी आणि शाळकरी मुले याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे याठिकाणी देखील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच गोवंडीतील पशुवधगृह परिसराला लागून आलेल्या झोपडपट्टी परिसरात देखील अनेक गटारांची झाकणे गायब आहेत. तर काही ठिकाणी अर्धवट झाकणे टाकण्यात आलेली आहेत. तर काही ठिकाणी टाकण्यात आलेली फायबरची झाकणे अर्धवट तुटून गटारात पडली आहेत.

First Published on July 13, 2019 1:57 am

Web Title: drainage open in the eastern suburbs abn 97
Just Now!
X