अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुलात शॉपिंग सेंटरचे आरक्षण बदलून तेथे नाटय़गृह उभारण्याच्या प्रस्तावास मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उपनगरांतील नाटय़प्रेमींना आणखी एका नाटय़गृहाचे दालन लवकरच खुले होणार आहे.
शहराच्या तुलनेत पश्चिम उपनगरांमध्ये लोकसंख्या अधिक आहे. ही लोकसंख्या पाहता विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृह आणि बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह कमी पडत आहेत. त्यामुळे उपनगरात आणखी एखादे नाटय़गृह उभारावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत होती. शहाजी राजे क्रीडा संकुलात शॉपिंग सेंटरसाठी आरक्षित असलेल्या जागेवर नाटय़गृह उभारावे, अशी मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली होती. या क्रीडा संकुलात नाटय़गृहाबरोबरच नाटकांच्या तालमींसाठी छोटी सभागृहेही उभारण्यात येणार आहेत. तसेच कलाकारांच्या निवासासाठी काही खोल्याही उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेला महसूलही मिळेल अशी अपेक्षा आहे.