22 February 2020

News Flash

नाटय़ प्रयोगांना उतरती कळा!

मराठी नाटय़सृष्टी आणि सर्व कलाकारांची ‘नाटय़पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शिवाजी मंदिर’सह मुंबई आणि ठाणे परिसरांतील नाटय़गृहांमध्ये नाटय़ प्रयोगांची वानवा झाली आहे.

| July 2, 2015 04:06 am

मराठी नाटय़सृष्टी आणि सर्व कलाकारांची ‘नाटय़पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शिवाजी मंदिर’सह मुंबई आणि ठाणे परिसरांतील नाटय़गृहांमध्ये नाटय़ प्रयोगांची वानवा झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रयोगांना उतरती कळा लागली आहे. जेथे दररोज सकाळ, दुपार आणि रात्र असे ‘हाऊसफुल्ल’ नाटय़प्रयोग होत असत तेथे आता दिवसातून जेमतेम एक किंवा दोन प्रयोग होत आहेत. आता क्वचितच तीन प्रयोग होण्याचे भाग्य लाभते आहे.
काही वर्षांपूर्वी शिवाजी मंदिर येथे एका दिवसात सकाळी ११/११-३०, दुपारी साडेतीन आणि रात्री साडेसात असे तीन-तीन नाटकांचे प्रयोग होत असत. मात्र आता हे चित्र बदलले आहे. शिवाजी मंदिरप्रमाणेच मुंबईतील दीनानाथ नाटय़गृह, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, दामोदर हॉल, यशवंत नाटय़ मंदिर, ठाण्यातील गडकरी रंगायतन, काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले व कल्याणच्या अत्रे रंगमंदिर येथेही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.
शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी असल्याने एप्रिल, मे ते अर्धा जून या कालावधीत शिवाजी मंदिर येथे सकाळी व दुपारी असे दोन वेळा बालनाटय़ांचे काही प्रयोग झाले. शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळचा प्रयोग येथे होतो; पण रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे हे चित्रही बदलले आहे. प्रेक्षकांची बदललेली आवड, दूरचित्रवाहिन्यांची वाढलेली संख्या, त्यावरून प्रसारित होणाऱ्या मालिका आणि घरबसल्या होणारे मनोरंजन यामुळे हा परिणाम झाला असावा, असे निरीक्षण शिवाजी मंदिर येथील ज्येष्ठ बुकिंग क्लार्क हरी पाटणकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले.
व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनीही प्रयोगांना उतरती कळा लागले असल्याचे मान्य केले. शिवाजी मंदिर किंवा अन्य नाटय़गृहांत काही वर्षांपूर्वी ‘बाल्कनी’ही हाऊसफुल्ल होत असे. आता बाल्कनी उघडलीही जात नाही. काही वर्षांपूर्वी फक्त दूरदर्शन होते. आता वाहिन्यांच्या संख्येतही मोठी भर पडली असून त्यावरील मालिका आणि घरबसल्या होणारे मनोरंजन याचा परिणाम नाटकांच्या प्रयोगावर झाला असल्याचे व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव म्हणाले.
नाटकाच्या प्रयोगाऐवजी शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग किंवा ज्ञाती संस्थांची स्नेहसंमेलने, मेळावे  नाटय़गृहात आयोजित केले जातात. नाटकाच्या प्रयोगाच्या तुलनेत असे कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ होतात. हे कार्यक्रम शक्यतो सकाळी किंवा दुपारी असतात. त्यामुळेही प्रयोगावर परिणाम झाला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारे खर्च, तिकिटाच्या दरावर आणलेले नियंत्रण, नाटय़गृहाचे भाडे, कमी झालेला प्रेक्षक यामुळे निर्मात्यांनाही नाटक करणे कठीण झाले आहे. नाटय़ निर्माते आणि नाटय़गृह चालक/व्यवस्थापन यांच्या चर्चेतून सामोपचाराने यातून काही चांगला तोडगा निघू शकेल.
-दिलीप जाधव, सचिव, व्यावसायिक नाटय़ निर्माता संघ

First Published on July 2, 2015 4:06 am

Web Title: drama in worst condition
टॅग Drama
Next Stories
1 वैद्य खडीवाले यांच्याशी थेट संवादाची संधी..
2 विश्व मराठी साहित्य संमेलन कायमचे बारगळणार?
3 राज्यातील चार हजार डॉक्टर बेमुदत संपावर