पावसाच्या आषाढ सरींनी शुक्रवारी मुंबई व परिसरात अक्षरश धुमाकूळ घातला. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेने शुक्रवारी सकाळी रौद्ररुप धारण करत मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले. मुंबई, नवी मुंबई, कर्जत, कसारा, ठाणे, पालघर, नालासोपारा, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर अशा मुंबई महानगर प्रदेशालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. नेहमीच्या प्रथेप्रमाणे या पावसामुळे दोन्ही रेल्वे कासवाच्या गतीने धावू लागल्या. वाहतूक कोंडींमध्ये बेस्ट, टॅक्सी, रिक्षा आणि खासगी गाडय़ा मंदावल्या, २० मिनिटांच्या प्रवासाला दोन तास लागले. संपूर्ण मुंबई अडखळत चालू लागली. मात्र, कधीही न थांबणारी मुंबई याहीवेळी थांबली नाहीच. पावसाच्या या तडाख्यात तीन जण मृत्युमुखी पडले असून त्यात एका पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. सुमारे ४० झाडे या जलप्रलयात धराशायी झाली. मात्र सुदैवाने कुठेही भिंत, इमारत अथवा दरड कोसळून हानी झाली नाही.
दरम्यान, अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते केरळ किनाऱ्यालगत गेल्या आठवडय़ापासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. ते आता ओडिशा किनारपट्टीपासून झारखंड-छत्तीसगडलगत पोहोचले आहे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून राज्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवार सकाळपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत पाऊस कायम राहील. विशेषत: कोकण-गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आला आहे.

आज-उद्या १५% पाणीकपात
पांजरापोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे आज, १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. हे काम २४ तासांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्यामुळे रविवारी दुपापर्यंत पाणीकपात कायम असेल.

३८ वृक्ष उन्मळले
अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. रस्ते जलमय झाल्यामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, एल्फिन्स्टन रोड (प.), सायन मार्ग क्रमांक २४, मिलन सबवे, सुधीर फडके रोड, भांडुप (प.), एस. व्ही रोडवरील नॅशनल कॉलेज या परिसरातील बेस्टच्या बसगाडय़ा अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या. पावसाच्या तडाख्यात मुंबईत ३८ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. बुधवारी दिवसभरात सुमारे २१ वृक्ष पडल्याची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे तीन आणि १४ वृक्ष पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

सखल भागातील पंप बंद
जलमय होणाऱ्या सखलभागातील पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी पालिकेने १८१ ठिकाणी २२२ पंप बसविले आहेत. मात्र बुधवारी संततधार पावसाला सुरुवात होताच हिंदमाता, मिलन सबवेसह अनेक सखलभाग जलमय झाले. काही ठिकाणचे पंप बंद पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. परिणामी सखलभागात साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा होऊ शकला नाही.

तीन जण ठार
गव्हाणपाडय़ातील त्रिमूर्ती रोडवरील मोक्षमहल टॉवरसमोर सुरू असलेल्या बांधकामासाठी मोठ्ठा खड्डा खणण्यात आला होता. रामदास संतू गोडे (२१) हा युवक या खड्डय़ात पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी रामदासला खड्डय़ातून बाहेर काढले आणि मुलुंड रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मानखुर्द येथील पीएनजी कॉलनी आणि कांदिवलीच्या चिकूवाडीनजिकच्या नाल्यामध्ये दोन मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटलेली नाही. पवई येथील आंबेडकर उद्यानात आपल्या मावशीसोबत फिरावयास आलेला पाच वर्षांचा ओंकार केशव गुरव नाल्यात पडून वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ओंकारचा शोध घेतला. मात्र अद्यापही तो सापडलेला नाही.

जलमय परिसर
माहीमचा धरमवीर राजे मार्ग, पिकले रुग्णालय, दादरमधील हिंदू कॉलनी लेन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, महेश्वरी उद्यान, मुख्याधापक नाला, एलबीएस मार्ग, मुलुंडचे भोईर नगर, विक्रोळी लिंक रोड, चेंबूरचा वाशीनाका, आनंद नगर, मिलन सबवे, दिंडोशी, गोरेगावचा राम मंदिर रोड, अंधेरीचे लोखंडवाला सर्कल, कांदिवलीचा टँक रोड, मालाडमधील पटेल कम्पाऊंड, सांताक्रूझ येथील एअर इंडिया मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसर.

रेल्वे कोलमडली
पावसाने जोर धरताच पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे कोलमडली. काही रेल्वे स्थानकांवरील इंडिकेटर बंद होती. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर सुमारे २० ते ३० मिनिटे गाडय़ा उशिरा धावत होत्या. हार्बरवरही संथगतीने वाहतूक सुरू होती. नालासोपारा येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे वसई स्थानकापर्यंत गाडय़ा धावत होत्या. पश्चिम, मध्य-हार्बरवरील अनुक्रमे २१ आणि ३३ गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. पावसामुळे वलसाडजवळ रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
या गाडय़ा रद्द
सुरत फ्लाइंग राणी, कर्णावती एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद डबल डेकर एक्स्प्रेस, वलसाड-मुंबई सेंट्रल-वलसाड पॅसेंजर, वलसाड- दाहोद -वलसाड इंटरसिटी एक्स्प्रेस, सुरत-विरार शटल, बडोदा-भिलाड – बडोदा एक्स्प्रेस, गुजरात क्वीन एक्स्प्रेस, अहमदाबाद – बडोदा – अहमदाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस. तसेच पावसाच्या तडाख्यामुळे अहमदाबादवरून मुंबईला निघालेली कर्णावती एक्स्प्रेस, अहमदाबाद- मुंबई सेंट्र डबल डेकर एक्स्प्रेस सुरतजवळ थांबवाव्या लागल्या. त्याचबरोबर गुजरात एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आदी गाडय़ा वाटेतच थांबविण्यात आल्या होत्या.

तुळशी ओसंडला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावांपैकी तुळशी तलाव शुक्रवारी सकाळी ओसंडून वाहू लागला. गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी तुळशी तलाव भरला होता. परंतु यंदा दीड महिना आधीच विक्रमी वेळेत तुळशी तलाव वाहू लागला आहे. आता तानसाही येत्या एक-दोन दिवसांमध्ये दुथडी भरून वाहू लागेल, अशी माहिती जलविभागातील अधिकाऱ्यांनी दिली.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच इतरही तलाव दुथडी भरुन वाहू लागतील. परिणामी भविष्यात मुंबईकरांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका होईल.

दिवसभरातील पाऊस (मिमी मध्ये) : दादर – १०९.७१, वडाळा – ११४.६२, एफ-उत्तर वॉर्ड ऑफिस परिसर – १२४.९९, धारावी – १०५.१६, वांद्रे – १२१.८८, बोरिवली – १०६.४३, दहिसर – ११२.७५