क्षेपणभूमीत जागा नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढलेला गाळ टाकायचा कुठे असा यक्षप्रश्न पालिकेपुढे मागील वर्षीच उभा राहिला होता. परंतु वर्षभरात गाळ टाकण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेणे पालिकेला शक्य झालेले नाही. गाळासाठी क्षेपणभूमी शोधण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर टाकल्यामुळे या कामाकडे अनेक कंत्राटदारांनी पाठ फिरविली. तब्बल चार वेळा निविदा काढल्यानंतर नाल्यांतील गाळ काढण्यासाठी मोठय़ा मुष्कीलीने ४६ कंत्राटदार तयार झाले. या विलंबामुळे नदी-नाल्यांतील गाळ पावसाळ्यात मुंबईकरांच्या दृष्टीने कर्दनकाळ बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्याचे काम १ एप्रिल रोजी सुरू होते. मात्र यंदा मुंबईतील क्षेपणभूमीत गाळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे पालिकेपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनीच गाळाची विल्हेवाट लावावी, अशी अट निविदेमध्ये घालण्यात आली. एरवी हे काम मिळविण्यासाठी कंत्राटदारांमध्ये अहमहमिका लागते. परंतु या अटीमुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरविली. पहिल्यांदा मागविलेल्या निविदांमध्ये केवळ सहा कंत्राटदार पुढे आले. त्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यावेळी २५ कंत्राटदारांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली. परंतु कंत्राटदारांची अपुरी संख्या लक्षात घेऊन तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली. तिसऱ्या फेरीत आणखी १५ कंत्राटदार पुढे आले. मात्र तरीही कंत्राटदार अपुरे पडत होते. अखेर चौथ्यांना निविदा काढण्यात आली आणि त्यात सहा कंत्राटदारांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली. चार वेळा निविदा काढण्यात बराच वेळ गेला.
एमएमआरडीएच्या क्षेत्रातील मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम पालिका सहा कंत्राटदारांना देणार होती. परंतु एमएमआरडीए आणि पालिकेत वाद निर्माण झाल्याने हे काम रखडण्याची चिन्हे आहेत. उर्वरित ४६ कंत्राटदारांना नालेसफाईची ७० कोटी रुपयांची कामे देण्यात येणार आहेत. मात्र या कामांचे प्रस्ताव अद्याप स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेले नाहीत. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कंत्राटदारांना कार्यादेश मिळतील आणि त्यानंतरच ही कामे सुरू होतील. परंतु प्रशासनाने हे प्रस्ताव अद्याप स्थायी समितीपुढे सादर केलेले नाहीत. परिणामी ही कामे आणखी आठवडाभर तरी सुरू होण्याची शक्यता नाही. हा विलंब पावसाळ्यात मुंबईकरांना भोवण्याची दाट शक्यता आहे.