पालिकेच्या विभाग कार्यालयांत विशेष कक्ष स्थापणार

झोपडपट्टय़ांमधील अनधिकृत जलजोडणी आणि पिण्याच्या पाण्याचा अन्य कामांसाठी वापर करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. यासाठी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना आणि भरारी पथक कार्यरत करण्यात येणार असून या कक्षासाठी आवश्यक ती पदे भरण्याबाबत प्रशासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईतील अनेक झोपडपट्टय़ांमध्ये अनधिकृतपणे जलजोडण्या घेण्यात आल्या आहेत. या जलजोडण्यांच्या माध्यमातून सर्रास मोठय़ा प्रमाणावर पाण्याची चोरी केली जात आहे. तसेच लहान-मोठय़ा सोसायटय़ांमधील बगीचासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. शौचालय, खासगी यानगृह, वाहन दुरुस्ती केंद्रांमध्येही बेकायदेशीरपणे पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे. रस्त्यांवर वाहने धुणाऱ्या व्यक्ती सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहेत. मुंबईबाहेरील तलावांमधील पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आणले जाते. शुद्धीकरणाची प्रक्रिया झाल्यानंतर पिण्यायोग्य पाणी जलवाहिनीच्या जाळ्यातून मुंबईकरांच्या घरी पोहोचविले जाते. यासाठी पालिकेला मोठा खर्च येत आहे. मात्र बहुसंख्य मुंबईकर पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कामांसाठी करून त्याचा अपव्यय करीत आहेत. अशा मंडळींच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयात तक्रारी येत असतात. या तक्रारींच्या निवारणासाठी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जल अभियंत्यांच्या अखत्यारीतील जल अभियंता यांच्या आस्थापनावर १० पदे निर्माण करण्यात आली आहेत. लवकरच ही पदे भरण्यात येणार आहेत.

विशेष कक्षातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अनधिकृत जलजोडण्यांबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यातून पालिकेला महसूल कसा मिळेल याचाही विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. जल विभागाअंतर्गत निर्माण केलेली पदे भरल्यानंतर तात्काळ भरारी पथक कार्यरत करून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.