पालिकेचा आंधळा कारभार; प्रक्रियायुक्त पाण्याचा खर्चवसुलीसाठी पिण्याच्या पाण्यावर ‘पाणी’

मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून निर्माण करण्यात आलेले ‘महाग’ पाणी खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याची सबब मुंबई महापालिका एकीकडे देत असताना शहरातील उद्यानांची हिरवळ टिकवण्यासाठी टँकर लॉबीकडून दररोज लाखो लिटर पाण्याची खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील बगिच्यांवर शिंपडण्यात येणारे हे पाणी पिण्याचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अशा स्थितीत पालिकेच्या ‘व्यापारी’पणावर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. त्यातही पुनप्र्रक्रियेसाठी  लागणाऱ्या हजार लिटर पाण्यामागील पाच रुपयांचा खर्च वसूल करण्यासाठी पालिका पिण्यायोग्य पाण्याचे वितरण करून हजार लिटरमागे साडेसात रुपये तोटा सहन करत आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईकरांना २० टक्के पाणीकपातीस तोंड द्यावे लागत आहे. शहरातील काही भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना पालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांत प्रक्रिया करण्यात येणारे ५.५ दशलक्ष लिटर पाणी दररोज वाया जात आहे. हे पाणी खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने ते समुद्रात फेकून द्यावे लागते, असे स्पष्टीकरण पालिकेकडून दिले जाते. मात्र, हे पाणी महाग असल्याने त्याला ग्राहक मिळत नसल्याचे चित्र आहे. सांडपाणी पुन्हा वापरण्यासाठी त्यातील बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमाण्ड) पाचपर्यंत खाली आणणे गरजेचे असते व त्यासाठी हजार लिटरमागे पाच रुपये खर्च येतो. अशी प्रक्रिया केल्यानंतर पालिका दहा रुपये प्रति हजार लिटर या दराने या पाण्याची विक्री करते. ठाणे, नाशिकमधील तलावांतून मुंबई महापालिकेला उपलब्ध होणारे पिण्याचे पाणी पालिकेमार्फत साडेतीन रुपये प्रति हजार लिटर या दराने विकले जाते. असे असताना दहा रुपये दराचे प्रक्रियायुक्त पाणी विकत घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे हे पाणी वाया सोडले जाते.

प्रत्यक्षात पाण्याच्या या व्यापारामागील पालिकेचे गणित तोटय़ाचेच ठरत आहे. साडेतीन रुपये प्रति हजार लिटर दराने पिण्यायोग्य पाणी ठाणे, नाशिक येथून मुंबईकरांच्या घरात पोहोचवण्यासाठी पालिकेला हजार लिटरमागे ११ रुपये खर्च येतो. म्हणजे, या पाण्याच्या वितरणात पालिकेला साडेसात रुपयांचा तोटा होतो. असे असताना पिण्यायोग्य पाण्याची बचत केल्यास पालिकेचे पैसे वाचतील तसेच टँकरवर पैसे खर्च करण्यापेक्षा हे कमी खर्चीक ठरेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, टँकर लॉबी, मैदानांचे पालकत्व घेतलेल्या संस्था आणि पालिकेचे काही अधिकारी यांच्या संधानामुळे प्रक्रिया केलेले सांडपाणी बागांसाठीही वापरले जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पालिकेच्या कुलाबा, बाणगंगा आणि माहीम येथील पुनप्र्रक्रिया केंद्रांमधून प्रक्रिया केले जाणारे पाणी सर्व बागा तसेच मैदानांसाठी वापरले जावे, यासाठी दोन वर्षांपूर्वी बैठकाही घेण्यात आल्या होत्या. मात्र मैदानांमध्येच सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारा असा तुघलकी सल्ला पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे, शहरात रोज लाखो लिटर पाणी पुरवणाऱ्या या टँकरना पाणी कुठून मिळते, याविषयीचा संशयदेखील कायम आहे.

पाण्याचे गणित

  • सांडपाण्यावरील प्रकियेचा खर्च :  ५ रुपये प्रति हजार लिटर
  • प्रक्रियायुक्त पाण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :  १० रुपये प्रति हजार लिटर
  • तलावातून आणल्या जाणाऱ्या पिण्यायोग्य पाण्याचा खर्च – ११ रुपये प्रति हजार लिटर
  • पालिकेकडून या पाण्यासाठी घेतले जाणारे शुल्क – ३ रुपये ५० पैसे प्रति हजार लिटर